Marathwada Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाच्या धडाक्यासाठी ओळखले जातात. कामातील ढिलाई, चालढकलपणा ते खपवून घेत नाही. वेळ प्रसंगी वरिष्ठ अधिकारी, पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकाऱ्यांनाही ते फैलावर घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. अजित पवार यांनी नुकताच परभणी दौरा केला. यावेळी घेतलेल्या आढाव्यात त्यांनी अनेक गोष्टींबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरातील स्वच्छतेवरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले होते.
मुंबईत परतताच आज मंत्रालयात अजित पवारांनी (Ajit Pawar) परभणी शहर विकास कामांचा आढाव घेत यातील अडथळे दूर करण्यासाठी बैठक घेतली. परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, क्रीडा संकुल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या साठ एकर जागेचा मागणी प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
तसेच परभणी (Parbhani) शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्वरित ठोस उपाययोजना राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरे धरणात पर्याप्त जलसाठा उपलब्ध आहे. मात्र वितरण व्यवस्थेच्या कमतरतेमुळे व नियोजनाच्या अभावामुळे परभणी शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करुन तातडीने सुधारणा करावी आणि नागरिकांना सुरळीत पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही अजित पवारांनी बजावले.
परभणी दौऱ्यावर असताना अजित पवार यांच्या समक्ष खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला होता. याची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी आपण मुंबईत गेल्यानंतर याची चौकशी करून, कारवाई करू, असा शब्द दिला होता. या शिवाय परभणी शहरातील बकालपणा, सुकलेली झाडे, अस्वच्छता याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांच्या कामावर असमाधान व्यक्त केले होते. या निमित्ताने मुंबईतील आढावा बैठकीत परभणी शहराच्या विकास कामातील अडथळे दूर करून त्याला वेग देण्याचे काम अजित पवारांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.