Ajit Pawar, Rajesh Vitekar and Parbhani Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्पष्टवक्ते आणि बेधकड स्वभावाचे आणि दिलेला शब्द खरा करून दाखववणारे नेते म्हणून सर्वपरिचित आहेत. हे सांगण्याच कारण म्हणजे परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना दोन महिन्यात आमदार करतो, असा दिलेला शब्द अजित पवार यांनी खरा करून दाखवला आहे.
2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर यांचा थोडक्यात झालेला पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. या पराभवानंतर जेव्हा परभणी जिल्ह्यातील काही पदाधिकारी अजित पवारांकडे(Ajit Pawar) कामं घेऊन गेले होते, तेव्हा त्यांनी आपल्या पद्धतीने त्यांना खडसावले होते. चांगल्या माणसाला तुम्ही निवडून देत नाही, अशा शब्दात अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची संभाषणाची एक क्लीप तेव्हा समाज माध्यमावर व्हायरल झाली होती.
राजेश विटेकर(Rajesh Vitekar) हे अजित पवार यांचे समर्थक व विश्वासू म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी विटेकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी दिली होती. पण त्यांचा शिवसेनेच्या संजय जाधव यांनी 42 हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, अजित पवार यांच्यासह तीसहून अधिक आमदार बाहेर पडले. मराठवाड्यात अजित पवारांची साथ देण्यामध्ये राजेश विटेकर आघाडीवर होते.
लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अजित पवार यांनी राजेश विटेकर यांच्यासाठी परभणी लोकसभेची जागा मागून घेतली होती. परंतु महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी माढा, बारामतीतून लढण्याची घोषणा केल्यानंतर तडजोडीमध्ये परभणीची जागा त्यांना सोडावी लागली. राजेश विटेकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यावेळी जिल्ह्यातील अजित पवार समर्थक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये होती.
एका मेळाव्यात अजित पवार यांनी तेव्हा राजेश विटेकरला दोन महिन्यात आमदार करतो, असा शब्द दिला होता आणि त्यांनी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीने राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली. अखेर अजितदादांनी परभणीकरांना दिलेला आपला वादा पूर्ण केल्याची भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.