

Shivsena News : भाजपाकडून विरोधकांना संपवण्याचे काम सुरू आहे. ते आधी त्या पक्षाचे हात-पाय तोडतात. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत सध्या तेच सुरू आहे. हीच दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची योग्य वेळ असल्याचे सांगत आमदार अंबादास दानवे यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले होते. यावर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्या मताशी सहमती दर्शवत भाजपाने आमचे मुंडकेच छाटल्याचा गंभीर आरोप केला होता.
सत्तार यांच्या विधानाचे राजकीय पडसाद महायुतीत उमटत असतानाच आज अब्दुल सत्तार आणि अंबादास दानवे यांची समृद्धी महामार्गावर भेट झाली. दोघांनी गाड्यांचा ताफा थांबवला, एकमेकांची गळा भेट घेतली. सत्तार यांनी उघडपणे भाजपाविरोधात घेतलेल्या भूमिकेचे दानवे यांनी कौतुक केले. दोन शिवसेना एकत्र याव्यात ही माझी इच्छा आहे, पण नेत्यांची इच्छा काय आहे? हे सांगता येत नाही, असे म्हणत सत्तार यांनी अंबादास दानवे यांची भेट घेत मुंबईत भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांच्या योगायोगाने झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा शिवसेनेकडून भाजपाने हिसकावून घेतली. भाजपा शिवसेना संपवत आहे, असा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी काल आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्यांचे सुपुत्र सिल्लोड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
अब्दुल सत्तार यांची ही राजकीय खेळी महायुतीच्या उमेदवाराला अडचणीची ठरू शकते. अशावेळी सत्तार यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्याशी सूर जुळत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणं पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत त्यासाठी वाट पहावी लागणार आहे. सत्तार-दानवे यांच्या समृद्धी महामार्गावरील काही मिनिटांची भेट, चर्चा आणि गळाभेट येणाऱ्या मोठ्या राजकीय वादळाची चाहूल असल्याचे बोलले जाते.
दानवेंकडून कौतुक...
अब्दुल सत्तार हे स्पष्टवक्ते आहेत, ते एखादी भूमिका मांडतांना कोणाचीही भीड बाळगत नाहीत. सिल्लोड-सोयगाव हा मतदारसंघ सत्तार यांनी मजबुतपणे बांधलेला आहे. त्यामुळे ते कोणालाही न घाबरता आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत ही त्यांची भूमिका त्यांचेच उदाहरण आहे. इतरांचे हात बरबटलेले, दबलेले असल्यामुळे ते भूमिका घेऊ शकत नाही, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.
अब्दुल सत्तार यांनी अंबादास दानवे यांना पुण्यातून मुंबईला आल्यावर वेळ काढून आपण भेटू. जिल्हा बँकेच्या विषयावर चर्चा करायची आहे, म्हणत भेटीचा आग्रह धरला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची हक्काची जागा शिवसेनेला सोडावी लागली, याबद्दल स्थानिक पातळीवर नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांनी ती उघडपणे बोलून दाखवल्यानंतर भाजपाचे नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. अशावेळी अंबादास दानवे मात्र सत्तार यांची पाठराखण करताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.