Shivsena UBT News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचा लागलेला निकाल हा धक्कादायक वगैरे काही नाही. ज्या भारतीय जनता पार्टीचा आत्माच भ्रष्टाचार आहे, त्या पक्षाला मिळालेले यश हे निर्भेळ कसे असू शकेल? आम्ही नेटाने लढलो, महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही नेटाने लढू, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी निवडणुकीतील पक्षाच्या अपयशावर भाष्य केले.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगिरी कमालीची घसरली. लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे नऊ खासदार निवडून आले, विधानसभेत वीस आमदार आहेत, त्या पक्षाची झालेली वाताहत हा चिंतेचा विषय ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या पक्षाचे नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत केवळ 9 नगरसेवक निवडून आले आहेत. फुलंब्री नगरपालिकेत एकमेव नगराध्यक्ष या पक्षाचा निवडून आला आहे.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत भाजपवर निवडणुकीत वारेमाप पैशाचा वापर केल्याचा आरोप केला. निकाल लागला असला तरी शिवसेना नेटाने लढाई लढली आहे. साधन कमी असले तरीही आम्ही ताकदीने लढा दिला आहे. सत्ता आणि संपत्ती याचा गैरवापर सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
परंतु एक दिवस सत्याचा येत असतो. शिवसेना केडर बेस पक्ष आहे, लीडर बेस आमचा पक्ष नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महायुतीतील मित्र पक्षाच्या नेत्यांच्या अनेक सभा वांझोट्या ठरल्या आहेत. सभा आणि निवडून येणे याचे समीकरण वेगळे असते, असेही अंबादास दानवे म्हणाले.
महापालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. महाविकास आघाडीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीशीही आमची बोलणी झाली आहे. महापालिका निवडणुकीला अगदी कमी अवधी शिलल्क असल्याने आघाडी संदर्भातील अंतिम बोलणी कधी आणि कशी असावी यावर आमची चर्चा सुरू असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुक निकालाचा महानगरपलिकेवर परिणाम होणार नाही. महापालिकेत मोठ्या प्रमाणावर मतदार असतात, नगर पालिका छोटी असते. त्यामुळे याचा मनपा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
भाजपने ज्या पद्धतीने निवडणुका जिंकण्यासाठी फोडाफोडी आणि पळवा पळवीचे राजकारण केले त्यामुळे भाजपमधील निष्ठावंत कमालीचे अस्वस्थ आणि नाराज आहेत. आताचा भाजप पक्ष हा मत विकत घेऊन तयार झालेला पक्ष बनला आहे. नितीन गडकरी यांच्यासारखे मोटे नेते तत्वज्ञानाची भाषा करतात, मात्र त्यांचे कोणीच ऐकत नाही. भ्रष्टाचार भाजपाचा आत्मा झाला आहे. यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असल्याचेही दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.