

Latur ZP Election News: भूकंपग्रस्त किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्याबाबात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिलेले आश्वासन 33 वर्षानंतर मी दुसरा पवार पूर्ण करणार, असं म्हणत भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्तेच्या अहंकारातून स्थानिक आमदारांनी हे वक्तव्य केलं आहे', अशा शब्दांत देशमुख यांनी अभिमन्यू पवारांवर निशाणा साधला.
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार अमित देशमुख आणि अभिमन्यू पवार यांच्यातील राजकीय कलगितुरा सुरू आहे. भाजपाने गुत्तेदार, ठेकेदारांना उमेदवारी दिली असून आमदारच जेव्हा ठेकेदार असतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, असा टोला काल एका सभेत अमित देशमुख यांनी अभिमन्यू पवार यांना लगावला होता. तर आम्ही कार्यकर्त्यांना तिकीटे दिली, तुम्ही गुत्तेदार, ठेकेदार वाळू, टँकर माफियांना उमेदवारी दिली. किती दिवस वडिलांच्या नावावर राजकारण करणार, स्वतःचे कर्तृत्व सिध्द करा, असा पलटवार अभिमन्यू पवार यांनी केला होता.
जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात असताना लातूर जिल्ह्यातील या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. "भूकंपग्रस्त किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आश्वासन दिले होतं ते आश्वासन 33 वर्षानंतर मी दुसरा पवार पूर्ण करणार आहे, असं विधान औसा इथल्या स्थानिक आमदारांनी केल्याचं मी ऐकलं आहे. खरं तर हे सत्तेच्या अहंकारातून केलेलं वक्तव्य आहे. हा वाढत चाललेला अहंकारच आम्हाला उतरवायचा आहे," असा इशारा अमित देशमुख यांनी एका प्रचार सभेतून दिला.
किल्लारीमध्ये भूकंप झाल्यानंतर काही तासात, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी इथं पोहोचून मदत कार्याला गती दिली. त्यांच्यासह शिवराज पाटील-चाकूरकर, शिवाजीराव पाटील-निलंगेकर या सर्वांनी मिळून जगातला आदर्श पुनर्वसन प्रकल्प इथं उभा केला. त्या पुनर्वासन प्रकल्पातील रस्ते, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था या सुविधांची दुरुस्तीही भाजपच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींना करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. असं असताना आपण कोणाबद्दल काय बोलावं? याचं भान भाजपच्या अहंकारी नेत्यांना राहिलेलं नाही. काँग्रेस पक्षाच्या आदरणीय नेत्यांनी मागच्या 60 -70 वर्षात जे काम उभं केलं आहे ते सांगून, विकासाची ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी आम्ही जनतेचा कौल मागत आहोत. त्यावरही अहंकारी मंडळी टीका करताना दिसत आहेत.
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजपच्या मंडळींचं सूत्र आहे, सर्वत्र भ्रष्टाचार टक्केवारी आणि कमिशनची चर्चा होताना दिसत आहे. जनतेने जागरूक होऊन आता या अहंकारी मंडळाची दुकानदारी बंद करावी, असं आवाहनही अमित देशमुख यांनी किल्लारी इथल्या प्रचार सभेत केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.