

Arjun Khotkar: जालना जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांच्याविरोधात दंड थोपटून असलेले शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर, भाजपाचे नेते रावसाहेब दानवे आता महायुतीमुळे एकत्र आले आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोघांमध्ये बिनसले होते, त्यामुळे युती होऊ शकली नाही आणि दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. महापालिकेत भाजपाची बहुमतासह सत्ता आली. तर शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले.
मात्र, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी आमच्यात मतभेद होते. पण मनभेद नव्हते म्हणत एकत्र शहराचा विकास करू, अशी ग्वाही दिली. दोन नेत्यांच्या या मनोमिलनामुळे त्यांच्या समर्थक सुखावल्याचे चित्र कार्यक्रमस्थळी पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रावसाहेब दानवे समर्थकांनी अर्जुन खोतकर यांच्यावर महायुती असून विरोधात काम केल्याचा आरोप केला होता.
विधानसभेत अर्जुन खोतकर यांचा जालना विधानसभा मतदारसंघातून विजय झाल्यानंतर खोतकर-दानवे पुन्हा एकत्र आले आहेत. महापालिका निवडणुकीत शतप्रतिशत सत्तेसाठी भाजपाने शिवसेनेसोबतची युती तोडली, त्यामुळे काही काळ पुन्हा दानवे-खोतकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, निवडणुका संपल्या राजकारण संपले म्हणत आता पुन्हा दोन्ही नेते एकत्र आले आहेत. आमच्यात कधीच मनभेद नव्हते, किरकोळ मतभेद होते ते ही दूर झाले आहेत. आता आम्ही दोघेही एकत्र येत शहराचा विकास साधू, असे अर्जुन खोतकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. शहरातील बालाजी चौक ते राजुर चौफुली (ढवळेश्वर मार्गे) या सुमारे 15 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे उद्घाटन शनिवारी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.
शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची कामे बऱ्यापैकी झाली आहेत. सोलापूर, जळगाव, संभाजीनगर, नागपूर, देऊळगाव राजा अशा शहराच्या चोहूबाजूने नॅशनल हायवे झाले आहेत. जालन्याची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. राजूर ते भोकरदन आणि विशाल कॉर्नर ते बस स्थानक या रस्त्याचे चार पदरी काम होणे आवश्यक आहे. शहराच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मी आणि अर्जुनराव महायुती म्हणूनच काम करणार आहोत, असे रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
तर बालाजी चौक ते ढवळेश्वर मार्गे राजुर चौफुलीपर्यंतचा रस्ता खराब झालेला होता. त्यामुळे आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूरला जाऊन भेट घेतली आणि या रस्त्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. भोकरदनकडे जाणाऱ्या या रस्त्यामुळे माझा आणि रावसाहेब दानवेंचा एकमेकांकडे जाणारा रस्ताही मोकळा झाला. राजकारणात मतभेद होत असतात, पण आमच्यात कधीच मनभेद झाले नाहीत. किरकोळ मतभेदही दूर झाले असून राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे मी आणि रावसाहेब दानवे मिळून शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही अर्जुन खोतकर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.