Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALILSarkarnama

Asaduddin Owaisi : इम्तियाज जलील बॅक टू विधानसभा, ओवेसींनी सांगितले तयारीला लागा...

Asaduddin Owaisi has ordered Imtiaz Jalil to contest the assembly elections again : 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी 13 जुलै रोजी शहरात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला.
Published on

Chatrapati Sambhajinagar : 'एमआयएम'चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी 13 जुलै रोजी शहरात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांच्या बैठका घेऊन विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील एकमेव निवडून आलेले पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना ओवैसी यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा टू लोकसभा आणि आता पुन्हा बॅक टू विधानसभा असा इम्तियाज यांचा प्रवास सुरू झाला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून इम्तियाज जलील हे पराभूत झाले. महायुतीचे संदिपान भुमरे यांनी त्यांचा तब्बल एक लाख 35 हजार मतांनी पराभव केला. संपूर्ण मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेली लाट संभाजीनगरात मात्र महायुतीच्या बाजूने कशी फिरली? यावर अजूनही विरोधकांकडून चर्चा केली जाते.

इम्तियाज जलील यांना मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळाली मात्र गेल्यावेळी जुळून आलेले दलित- मुस्लिम कॉम्बिनेशन यावेळी बिघडले आणि इम्तियाज जलील यांचा पराभव झाला. हा पराभव ओवेसी यांच्या चांगला जिव्हारी लागला होता.

महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी जशी समाजाची एकजूट दाखवून आठ खासदार निवडून आणले, तशी एकजूट मुस्लिम समाज का दाखवू शकला नाही? अशी खंत व्यक्त केली होती.

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Hemant Patil : भावना गवळी अन् तुमानेंना दिलेला शब्द CM शिंदेंनी पाळला; हेमंत पाटलांचं काय?

इम्तियाज जलील लोकसभेत नाहीत याचे दुःख होत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले होते. 'एमआयएम'च्या राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, असा आग्रह सर्वच पदाधिकार्‍यांनी धरला होता.

इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका यांच्याकडे मांडली होती. तुम्ही जिल्हाभरात कामाला लागा, पण विधानसभा तुम्हाला लढवावी लागेल, असे स्पष्ट शब्दात ओवेसी यांनी त्यांना सांगितले.

त्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा इम्तियाज जलील निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात इम्तियाज जलील हे पहिल्या नंबर वर होते. शहरी भागातील मुस्लिम मतदारांनी त्यांना एकगठ्ठा मतदान केल्याचे समोर आल्यानंतर 'एमआयएम'ने (MIM) या दोन्हीही मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

पूर्व मतदारसंघातून डॉ.गफ्फार कादरी हे पुन्हा लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रभावानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि काही प्रमुख नेत्यांनी इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या पराभवासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला गेला. या आरोपाच्या संशयाची सुई कुठेतरी गफार कादरी यांच्याकडे दिसते. त्यामुळे विधानसभेला नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी पुढे आल्याचे बोलले जाते.

पूर्व मतदारसंघाबद्दल ओवेसी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांनी पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना निवडणूक लढवण्याची सूचना केली आहे. इम्तियाज जलील यांचे राजकारणातील पदार्पण 2014 मध्ये याच मध्य विधानसभा मतदारसंघातून झाले होते. शिवसेना-भाजप युती तुटल्याचा थेट फायदा इम्तियाज यांना झाला आणि त्यांनी शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत पहिल्याच दणक्यात विधानसभेत एन्ट्री केली होती.

Asaduddin Owaisi, MP IMTIAZ JALIL
Manoj Jarange Patil : सोशल इंजिनिअरींगच्या तयारीत मनोज जरांगे, 'दलित, मुस्लिम, धनगर एकत्रित...'

2019 मध्ये ओवेसींनी त्यांना प्रमोशन देत लोकसभेची निवडणूक लढवायला सांगितली आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या मत विभाजनाचा फायदा घेत इम्तियाज जलील पहिल्याच प्रयत्नात लोकसभेतही पोहोचले. यावेळी मात्र त्यांना अपयश आले.

आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघातून यांना पुन्हा निवडून आणत महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये उंच भरारी घेण्याचा प्रयत्न एमआयएम चा दिसतो. महापालिकेत वर्चस्व कायम राखायचे असेल तर शहरात किमान एक तरी आमदार असावा हा दृष्टिकोन ठेवून ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com