Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचे भाऊजी माजी मंत्री भास्कर पाटील - खतगावकर यांच्यात कायम मतभेद राहिले. एकाच जिल्ह्यात आणि एकाच पक्षात असूनही या दोन नेत्यांमध्ये कायम विळ्या - भोपळ्याचे सख्य होते. अशोक चव्हाण यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करत खतगावकर यांनी अगदी भाजपमध्ये जाण्याचाही निर्णय मध्यंतरीच्या काळात घेतला होता.
खतगावकर यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळेच अशोक चव्हाण यांची गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदारकी हुकली. खतगावकरांचा प्रभाव असलेल्या भागात त्यांनी मेहुण्याच्या विरोधात भाजपचे प्रताप पाटील - चिखलीकर यांना मदत केली आणि त्यांच्या खासदारकीमध्ये महत्त्वाची भूमिकाही बजावली. खतगावकरांची नाराजी भविष्यात परवडणारी नाही, हे ओळखून अशोक चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी दाजींची मनधरणी करत त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणले. याचा फायदा अशोक चव्हाण यांना देगलूर - बिलोली विधानसभा मतदारसंघात झाला आणि जितेश अंतापूरकर हे पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चव्हाण - खतगावकर यांच्या एकीमुळेच काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचे स्वप्न रंगवत होते, पण अशोक चव्हाणांनीच काँग्रेसला हात दाखवत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि केवळ नांदेडच नाही तर संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचा खेळखंडोबा झाला. अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण कोण भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू झाली तेव्हा भास्कर पाटील - खतगावकर काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
वर्षभरापूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी केलेले खतगावकर मेहुण्याला साथ देणार की, मग काँग्रेसची जिल्ह्यातील धुरा सांभाळणार ? अशी चर्चा झडत असतानाच खतगावकर यांनीही मेहुण्याच्या वाटेवर जाण्याचा निर्णय बोलून दाखवला. काल अशोक चव्हाणांच्या निर्णयावर गप्प असलेल्या खतगावकरांनी आज मात्र अशोक चव्हाण जो निर्णय घेतील, मी त्यांच्यासोबत असेल. पूर्ण ताकदीनिशी आपण चव्हाण यांच्या पाठीशी राहणार आहोत.
मराठवाड्याच्या विकासासाठी केंद्रात नेता हवा, त्यामुळे चव्हाणांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे खतगावकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 'तुझं माझं जेमना अन् तुझ्या वाचून करमेना', अशीच काहीशी अवस्था खतगावकरांची झाली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रात मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा आहे.
सोबत येणाऱ्या खतगावकरांचे पुनर्वसन अशोक चव्हाण कसे करणार ? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवाराची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. अशावेळी भाजपमध्ये फिरून आलेल्या भास्कर पाटील - खतगावकर यांना पुन्हा पक्ष प्रेवश देऊन त्यांना नांदेडची उमेदवारी देण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खतगावकर चव्हाणांनंतरचे वजनदार नेते...
भास्करराव पाटील - खतगावकर हे काँग्रेसचे मराठवाड्यातील मोठे नेते म्हणून ओळखले जातात. 1990 ते 1998 या काळात महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. या शिवाय ते तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडून गेले होते. बिलोली मतदारसंघातून 1990, 1995 आणि 2004 अशा तीन वेळा ते काँग्रेसकडून निवडून आले होते.
शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये ते महाराष्ट्र सरकारचे सहकार, गृह (कारागृह), ग्रामीण विकास आणि पुनर्वसन मंत्री होते. भास्करराव पाटील खतगावकर यांनी गोदावरी मानर सहकारी कारखाना स्थापन केला. गोदावरी मानर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी नांदेडमधील लाखो शेतकरी व त्यांच्या घटकांना रोजगाराच्या माध्यमातून मदत केली.
त्यामुळे ते जिल्ह्यात लोकप्रिय आहेत. या जोरावरच नांदेड लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून तसेच बिलोली मतदारसंघातून तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही त्यांचे वजन आहे.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.