Jalna News : जालन्यात सुरू झालेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन लाठीचार्ज करून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर मात्र राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक होऊन ठिकठिकाणी बंद जाहीर पुकारण्यात आले. परिणामी आंतरवाली सराटी या गावात सुरू झालेल्या आंदोलनाची धग राज्यभर पसरल्याचे दिसून येत आहे. लाठीमारावरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली. मात्र स्वकीयांनीही कान टोचण्याची संधी सोडली नाही. यात आमदार बच्चू कडू नेहमीप्रमाणे आघाडीवर असल्याचे दिसून आले. (Latest Political News)
मुख्यमंत्री किंवा गृहविभागाच्या आदेशाशिवाय आंदोलकांवर गोळीबार आणि लाठीचार्ज होऊ शकत नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यात आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारला निर्वाणीचा इशारा देऊन मित्रपक्षांचीही भर पडली आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी 'मराठा समाजाला आरक्षण देण्यात दिरंगाई करून अंत पाहू नका, अन्यथा सरकारचा अंत होईल', असा इशाराच दिला आहे. यापूर्वीही मंत्रिपदावरून बच्चू कडू (Bachchu Kadu) सरकारवर नाराज असल्याचे वारंवार समोर आले आहे. आता जालन्यातील हल्ल्यावरून पुन्हा आपल्याच सरकारला घेरण्याची आलेली संधी कडू यांनी सोडली नाही.
कडू म्हणाले, "मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडून नका. मराठा हाच कुणबी आणि कुणबी हाच मराठा आहे. माझ्या वडिलांच्या टीसीवर मराठा आहे, मात्र महसुलीवर कुणबी आहे. आता हे दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी वेगळ्या आरक्षणाची आहे का? किंवा मराठ्यांनाच कुणबी म्हणायची गरज आहे, आता हे वेगळे सांगायची गरज नाही. राज्यातील मराठा हा कुणबी आहे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. सरकारला विनंती करतो की आता अंत पाहू नका. नाहीतर सरकारचा अंत होण्यास वेळ लागणार नाही."
दरम्यान, राष्ट्रवादीचे अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून कडू हे आपल्या सरकारला वारंवार टोले लगावताना दिसत आहे. पहिल्या पंगतीतील लोक उपाशी राहिले तर मागून आलेल्यांना जेवण मिळाले, असे म्हणत यापूर्वी कडूंनी शिंदे-फडणवीस-पवारांवर निशाणा साधला होता. यानंतर आता ब्रम्हदेव आले तरी मी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले होते.
यानंतर मराठवड्यातील मराठा आरक्षणावरून सरकारला लक्ष्य करण्याची आलेली संधी सधात अप्रत्यक्षपणे का होईना आमदार बच्चू कडूंनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. यामुळे जालन्यातील आरक्षणाचा पेटलेला मुद्दा शिंदे-फडणवीस-पवारांची झोप उडवणार असाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.