Hingoli Shivsena News : आपल्या विधानांमुळे कायम वादात सापडणाऱ्या कळमनुरीचे शिवसेना आमदारा संतोष बांगर पुन्हा अचडणीत सापडले आहे. `बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्यासाठी गाड्या पाठवा, त्यासाठी जे लागेल ते द्या, फोन पे करा`, असे जाहीर केलेले विधान बांगर यांच्या अंगलट आले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भात बांगर यांना नोटीस पाठवून 24 तासात खुलासा करण्यास सांगितले आहे.
निवडणुकीआधीच बांगर आयोगाच्या कचाट्यात सापडल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षाच्या विद्यमान आणि संभाव्य उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कळमनुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी कळमनुरी शहरात काल ( ता.18) रोजी नियोजनासाठी पक्षाची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामाच्या निमित्ताने बाहेरच्या जिल्ह्यात गेलेल्या मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी जे करावे लागेल ते करा. गाड्या लावा, कशाची चिंता करू नका, त्यासाठी फोन पे करा, असे आवाहन बांगर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ चॅनल आणि सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि एकच गदारोळ सुरू झाला.
विरोधकांनी बांगर यांच्याविरोधात कार्यवाही करा, अशी मागणी करत बांगर यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुक आयोगाने बांगर यांच्या या जाहीरपणे केलेल्या विधानाची गंभीर दखल घेतली असून या संदर्भात बांगर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Hingoli) चोवीस तासात केलेल्या विधानाचा खुलासा करा, असे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे. एकूणच हे ` फोन पे` प्रकरण बांगर यांना महागात पडणार असे दिसते.
संतोष बांगर यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना तो व्हिडिओ आपला नसल्याचे म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर फोन पे चा अर्थ मला माहित नाही, गुगल पे सुद्धा माहित नाही असेही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बांगर यांनी एका चॅनलवर प्रतिक्रिया देताना हा व्हिडिओ आपला असला तरी तो एडिट करून आवाज लावलेला दिसतो, असे म्हणत आरोप फेटाळले. मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हा व्हिडिओ विरोधकांनी तयार केलेला आहे.
माझ्या विरोधात जे काही झाले ते चुकीचे आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही म्हणून ते असे खोटे धंदे करत आहेत, असा आरोप बांगर यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नंतर माझा हाच खुलासा असेल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले आहे. `फोन पे` चा अर्थ मला माहित नाही, गुगल पे सुद्धा मला माहित नसल्याचे बांगर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.