

Beed Politics News : बीड शहरातील कब्बाडगल्ली येथे काही दिवसांपूर्वी माजी न.प.सभापती बाळासाहेब जाधव आणि भाजप नगरसेविकेचे पती सागर देशपांडे यांच्यात कचरा व बोअरच्या कारणावरून वाद झाला होता. यातूनच सागर देशपांडे यांना पाच ते सहा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. देशपांडे यांनीही प्रतिकार केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, हा वाद स्थानिक पातळीवर मिटणारा असताना त्याला राजकीय स्वरुप देऊन जातीय रंग देत अनावश्यक प्रसिद्धी दिली जात असल्याचा आरोप सर्वपक्षीय संघटनाच्या शिष्टमंडळाने केला. विविध पक्ष व संघटनांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.16) पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेतली.
यावेळी कब्बाडगल्ली येथील प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असून पोलीस प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सदर प्रकरणामुळे कब्बाडगल्लीसह जिल्ह्याची आणि बीड पोलीस प्रशासनाचीही बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.
दिलेल्या या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड.चंद्रकांत नवले, जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे, संभाजी ब्रिगेडचे शरद चव्हाण, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमण, शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष जाधव, मराठा आरक्षण कृतीसमीतीचे जयमल्हार बागल, मराठा सेवक गंगाधर काळकुटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रभागात विविध समाजातील नागरिक राहत असून हा केवळ कचरा व पाणी समस्येवरून झालेला वाद आहे. मात्र, काही जण स्वत:च्या फायद्यासाठी त्याला जातीय रंग देत असल्याचा आरोप प्रा. किशोर काळे यांनी केला. तसेच मी सुद्धा ब्राम्हण समाजाचा असून माझ्यावर याच लोकांनी हल्ला केला होता, तेव्हा जात कुठे गेली होती? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
तर आज विविध संघटना एकत्र येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही बाजूंनी संयम ठेवून चर्चा करुन विषय मार्गी लावावा. कारण क्षीरसागरांचे कामच वाद पेटवणे, भांडण लावणे असे आहे. या प्रकाराला कुणीही बळी पडू नये, आंदोलनाची भाषा केल्यास आम्हालाही आंदोलन करावे लागेल असे शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड.चंद्रकांत नवले यांनी म्हटले.
जाधव व देशपांडे यांचा गल्लीतील हा किरकोळ वाद आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीसांनी दोघांवरही कार्यवाही केलेली आहे. मात्र या प्रकरणाला जातीय व राजकीय वळण देऊ नये. तसेच डॉ.योगेश क्षीरसागरांनी आंदोलनाचा इशारा दिला. हा एक प्रकारे पोलीस प्रशानावर दबाव टकाण्याचा प्रयत्न आहे. असा दबाव न टाकता समोपचाराचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांनी केले आहे.
दरम्यान, भाजपाचे नगरसेवक व स्थानिक नेते योगेश क्षीरसागर यांनीही आपल्या शिष्टमंडळासह पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पोलीसांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.