

Beed Politics : गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून आपल्या पक्षाची अब्रू वेशीला टांगणारे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मंगळवारी (ता.1सप्टेंबर) एकाच हाॅटेलमध्ये हास्यविनोद करताना दिसले.
बीड शहरातील बशीरगंजमधील एका चहाच्या हॉटेलवर या सगळ्या नगरसेवकांना एकत्र पाहून बीडकरांनाही धक्का बसला असेल. सर्वसाधारण सभेत एकमेकांचे कपडे वस्त्रहरण करणारे सत्ताधारी नगरसेवक नेमकं जनतेच्या प्रश्नावर एकत्र आले की मग निधीचे वाटप करण्यासाठी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांची गटबाजी, एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न संपला असेल आणि ते खरच एकत्र आले असतील तर बीडकरांचा जीव निश्चितच भांड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्ताधारीच भांडत असल्याने बीडकरांनी पाहिलेले बारामती पॅटर्नचे स्वप्न धुळीस मिळते की काय? अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती.
पण बशीरगंजमधील्या हॉटेलमध्ये एकाच बाकड्यावर बसून, चहाच्या घोटासोबत तोंड गोड करत नगरसेवकांनी वाद मिटवल्याचे बोलले जाते. हे 'हम साथ साथ है' चे चित्र यापुढे कायम दिसणार की मग? हा आनंद क्षणाचाच ठरणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. पटेल, मुळूक, नाईकवाडे आणि मुजीबभाई हे सर्व नगरसेवक एकाच टेबलवर बसून हसत-खेळत दिसल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या गेल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून बीड नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीने कळस गाठला होता. सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक जेव्हा व्यासपीठावर आणि सभागृहात एकमेकांच्या अंगावर धावून जात होते, तेव्हा सामान्य जनतेला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली होती. आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी आणि दिव्यांच्या प्रश्नावरून हे लोक रान पेटवतील असा भाबडा समज बीडकर करून बसले होते.
मात्र, आता पुन्हा त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोमवारी (ता.३१) फारुक पटेल, विनोद मुळूक, अमर नाईकवाडे आणि नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीबभाई या सर्व बड्या असंतुष्ट व सत्ताधारी नेत्यांनी एकत्र येत 'शिवछत्र'चा एकछत्री अंमल मान्य केला. कालपर्यंत जे एकमेकांचे तोंड पाहायला तयार नव्हते, ते आज एकाच ताटात आणि एकाच टेबलवर दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.