NCP News : पंडीत, क्षीरसागर की आणखी कोणी ? बीड राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा पेच; फाटाफुटीमुळे नेते विखुरले!

Beed Local Body Election 2025 : एकेकाळी राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते जयदत्त क्षीरसागर मागच्या सहा वर्षांपूर्वी पक्षातून बाहेर पडले.
Beed NCP Political Leadership News
Beed NCP Political Leadership NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या निवडीवरून पेच निर्माण झाला असून पंडीत, क्षीरसागर आणि इतर काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

  2. अजित पवार या प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार असून स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे.

  3. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

दत्ता देशमुख

Beed Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या साहेबांच्या राष्ट्रवादीने अजितदादांच्या पक्षावर मात केली. दरम्यान, अजित पवारांनी बीड जिल्ह्यात नव्याने संघटनात्मक बांधणी करत पक्षाला वळणावर आणण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर बारामतीप्रमाणे बीडकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. अनेक योजना, प्रकल्प विकासकामे बीडमध्ये आणून अजित पवारांना बीड जिल्हा पुन्हा पक्षाचा बालेकिल्ला करायचा आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणासह इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याने निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात बीड नगरपालिका निवडणुकीसाठी नेमकं नेतृत्व कोणाकडे सोपवायचे? असा पेच निर्माण झाला आहे. पक्षफुटी नंतर 'आधे इधर आधे उधर'अशी स्थिती सध्या पक्षात निर्माण झाली आहे.

पालिका आणि क्षीरसागर यांचे तीस वर्षांपासूनचे अतूट बंधन, सर्वाधिक काळ नगराध्यक्ष असल्याचा डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा विक्रम, 2012 च्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीला 50 पैकी केवळ एका जागेवर समाधान अशी त्यांची ताकद. मात्र, मागच्या निवडणुकीत त्यांना पुतणे संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनीच आव्हान दिले. परंतु, आमदार क्षीरसागरांसह एमआयएमचे नगरपालिकेतील अनेक शिलेदारही पुन्हा आपल्या तंबूत आणण्यात डॉ. क्षीरसागर यशस्वी झाले.

Beed NCP Political Leadership News
Beed News : गोपीचंद पडळकरांचा मोर्चा होताच जेलरला दणका ; पेट्रस गायकवाड यांची थेट नागपूरला बदली!

परंतु, त्यांचा वारसा चालविणारे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यापासून पालिकेतील वडिलांचे निष्ठावंत शिलेदार दुरावले आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाने मध्यस्थी केल्याने पक्षांतर्गत विरोधकांचीही 'दगडापेक्षा वीट मऊ'(आमदार संदीप क्षीरसागर कट्टर विरोधक असल्याने पक्षाचा प्रचार बरा या अर्थाने) अशी स्थिती झाल्याने या मंडळींनी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा प्रचार केला. मात्र, त्यानंतर वर्षभरात दुरावलेल्यांना पुन्हा जवळ करण्यात त्यांना यश आले नाही.

Beed NCP Political Leadership News
Sandip Kshirsagar On Dhananjay Munde : आरोपी जवळचे असले तरी दोन दिवसात गुन्हा नोंद अन् अटक! मी तुमच्यासारखा पळून गेलो नाही..

आता निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत असताना पक्षातील बहुतांश माजी नगरसेवक त्यांच्यापासून दूर होत माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात आहेत. नुकतीच योगेश व सारिका क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी भीमराव वाघचौरे, किशोर काळे, गणेश वाघमारे, भास्कर जाधव, नरसिंग नाईकवाडे, शिवाजी जाधव, अशोक वाघमारे, विकास जोगदंड, प्रेम चांदणे, रवी जवेरी, बाळासाहेब जाधव, सुभाष सपकाळ, मुस्तफा शेख, नशीर अन्सारी, बाळासाहेब आंबेकर, महेश गर्जे, बाळासाहेब गुंजाळ, रवींद्र कदम अशी मोजकीच जनमत असलेली मंडळी हजर होती.

फारुक पटेल, विनोद मुळूक, अमर नाईकवाडे, विलास विधाते, दिनेश मुंदडा, शेख निझाम, रमेश चव्हाण, बाबूराव दुधाळ ही शहरात जनमत आणि पालिका राजकारणात असलेली अवलिया मंडळी मात्र अनुपस्थित होती. यावरून 'आम्हाला तुमचे नेतृत्व अमान्य' असा स्पष्ट संदेशच या मंडळींनी दिला. त्यामुळे पक्षाची शहरात ताकद असली तरी गटबाजी आणि निवडणुकीत नेतृत्व कोणाकडे, हा मुख्य पेच आहे.

बॅनरवर केवळ पवार, तटकरे

दरम्यान, योगेश क्षीरसागरांनी बोलविलेल्या बैठकीच्या बॅनरवर पक्षाध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांचेच फोटो होते. एरव्ही क्षीरसागरांच्या बॅनरवर आमदार धनंजय मुंडेंसह कधी चुलते जयदत्त क्षीरसागर, वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचेही फोटो असतात. त्यातच आता जिल्हाध्यक्ष अॅड.राजेश्वर चव्हाण यांनीही आज नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच पक्षाची बैठक बोलावल्याने क्षीरसागरांची बैठक नेमकी कशासाठी, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

क्षीरसागरांचा प्रवेश 'अटीं'त अडकला

एकेकाळी राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते जयदत्त क्षीरसागर मागच्या सहा वर्षांपूर्वी पक्षातून बाहेर पडले. एकदा शिवसनेकडून पराभव व मागच्या वेळी अपक्ष उमेदवारीतून माघार घेतल्यानंतर आता ते कोण्याही पक्षाच्या माध्यमातून राजकीय प्रवाहात येण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचीही त्यांनी चाचपणी केली. मात्र, तालुक्याचे नेतृत्व हाती (जयदत्त व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याकडे) द्यावे, अशी त्यांची प्रमुख अट आहे. या अटीतच त्यांचा प्रवेश थांबल्याचे सांगितले जाते.

FAQs

प्र.१: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमका वाद कशावर आहे?
उ. जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत नेतृत्व कोणाकडे द्यायचे यावरून पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत.

प्र.२: कोणती प्रमुख नावे चर्चेत आहेत?
उ. पंडीत, क्षीरसागर आणि काही स्थानिक नेत्यांची नावे पुढे येत आहेत.

प्र.३: अजित पवार यांची भूमिका काय आहे?
उ. अजित पवार स्वतः अंतिम निर्णय घेणार असून ते सर्व पक्षनेत्यांची मते घेत आहेत.

प्र.४: या निर्णयाचा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
उ. चुकीचा निर्णय घेतल्यास पक्षातील गटबाजी वाढू शकते आणि निवडणुकीत फटका बसू शकतो.

प्र.५: बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सध्याची ताकद कशी आहे?
उ. बीडमध्ये राष्ट्रवादीचा काही भाग मजबूत असला तरी स्थानिक गटांतील मतभेदांमुळे संघटन कमजोर झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com