बीड : पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतणे गँग सक्रिय झाली आहे, असा टोला नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharatbhushan Kshirsagar) यांनी लगावला आहे.
डॉ. क्षीरसागर यांनी एका दगडात तीन पक्षांवर निशाणा साधला आहे. ते शहरातील विकास कामांबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टिकास्त्र सोडले. विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केलं? राजकीय स्पर्धा असावी मात्र, ती विकासात खोडा घालणारी नसावी. आपण ८८ कोटी रुपयांची विकास कामे आणली असल्याचा यावेळी दावा करत तुम्ही १०० कोटींचे आणा, असे आव्हानही त्यांनी आमदार क्षीरसागरांना दिले.
तुम्ही आमदार व्हावे म्हणून विष कालविण्याचे काम केले, असा आरोप करत माझे वय ६० वर्ष झाले तसेच ३५ वर्षांपासून नगराध्यक्ष आहे, मात्र, मी कधीही आमदार व्हायचे म्हणालो नाही, असा हल्लाबोल डॉ. क्षीरसागरांनी पुतणे आमदारांवर केला. पदासाठी रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही. महाराष्ट्रात पुतण्या गॅंग झाली आहे. परळी, बारामती आणि बीडमध्ये पुतण्या गँग आहेत, असे म्हणत डॉ. क्षीरसागरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.
डॉ. क्षीरसागर म्हणाले, शहरात मागच्या काळात नगरोत्थान योजनेतून मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. राज्यातील कोणत्याच नगरपालिकेला मिळाला नाही इतका निधी बीड नगरपालिकेला मिळाला. पहिल्या टप्प्यात तब्बल ८८ कोटींचे रस्ते बीड शहरात झाले असून तब्बल ९० कोटींचा दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव आम्ही शासनाला दिला आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार आहे, अशी माहिती देत, उद्या या कामांना मंजूरी मिळाल्यानंतर पुन्हा भलतेच लोक याचे श्रेय घ्यायला येतील, असा टोलाही डॉ. क्षीरसागरांनी यावेळी लगावला.
विकास कामे करताना कधी राजकारण आणले नाही, विरोधकांच्या वॉर्डामध्येही निधी दिला. बीड पालिकेने शहरातील बहुतांश मोठे रस्ते सिमेंटचे केले. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला बार्शी रोड व नगर रोड मात्र, सिमेंटचा होत नाही. बांधकाम विभागाला निधीची कमतरता नसतानाही हे रस्ते सिमेंटचे का होत नाहीत, असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, शहरातील अमृत अटल योजनेचे काम जीवन प्राधिकरण मार्फत होत आहे. हे काम अनेक दिवसांपासून रखडले असून त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहेत. ही कामे लवकर व्हावीत यासाठी आम्ही उपोषण केले. मात्र, अजूनही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही क्षीरसागरांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.