Latur News : लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. कदाचित अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. राज्यात महायुती-महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उमेदवारी कापली जाणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी मात्र आपण गेल्या पाच वर्षांत मतदारसंघामध्ये खूप विकासकामे केली आहेत, त्यामुळे उमेदवारी मला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय आमची संसदीय कमिटी घेत असले, पण मला आशा आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या विरोधात सुरू असलेल्या चर्चा मुद्दाम पसरवल्या जात असल्याचा आरोपही केला.
गेल्या निवडणुकीत भाजपने सुधाकर श्रृंगारे (Sudhakar Shringare) यांना उमेदवारी दिली होती. नवखा चेहरा असूनही मोदी लाट आणि भाजपचे संघटन या जोरावर ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. पण मतदारसंघाशी गेल्या पाच वर्षात त्यांचा फारसा संपर्क आला नाही. पक्ष, संघटनेच्या कामातही ते फारसे दिसले नाही. त्यामुळे जिल्ह्यात त्यांच्याबद्दल नाराजी असून 2024 मध्ये श्रृंगारे यांच्याऐवजी भाजप नवा उमेदवार देणार, अशी चर्चा आहे. या सगळ्या शक्यता आणि चर्चा फेटाळत उमेदवारी मलाच मिळणार, असा ठाम दावा श्रृंगारे यांनी केला.
लातूर जिल्ह्यात रेल्वे कोचची फॅक्टरी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी भरघोस निधी, रेल्वे गाड्यांना अतिरिक्त डब्बे, या शिवाय लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठीची योजना यावर आपण काम केले. लवकरच रेल्वे कोच फॅक्टरीमधून वंदे भारत ट्रेनचे डब्बे तयार होण्याचे काम सुरु होईल. कोरोना काळात काम बंद होते, त्यामुळे प्रत्यक्षात कोच निर्मिती रखडली, परंतु आता त्याला वेग आल्याचा दावाही श्रृंगारे यांनी केला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातून राज्यातील युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचेही नाव चर्चेत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. यावर तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पण ही जागा भाजपची (BJP) असल्यामुळे बनसोडे यांना जर लोकसभा लढवायची असेल तर त्यांना आती भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल, असा चिमटाही श्रृंगारे यांनी काढला. निवडणुक अवघ्या तीन महिन्यावर आल्या असताना खासदार श्रृंगारे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा केल्याने ते सक्रीय झाले आहेत, असे दिसते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.