Latur News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसच्या गडावर भाजपने दोन वेळा विजय मिळवला आणि आता पुढील निवडणुकीची तयारी बुथनिहाय स्तरावरून सुरु केली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे यांनी नुकतीच लातूर लोकसभेची आढावा बैठक घेऊन चाचपणी केली.
इच्छुक खूप असले तरी पुर्नरचनेत अनुसूचित जातींसाठी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेस सतत आश्वासक चेहरा आणि सक्षम उमेदवारांच्या शोधात राहिली आहे. यावेळी अद्याप तरी तसा चेहरा दृष्टीपथात नाही. म्हणजे लोकसभेची जोरदार तयारी, पण उमेदवार `कोणाच्या घरी`असे म्हणण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)
अनेक दशकं लातूर लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसचा गड म्हणून ओळख होती. देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर अशा दिग्गज काँग्रेस नेत्यांची या मतदारसंघावर पकड होती. मतदारसंघ पुर्नरचनेनंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली.
पुढे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची या मतदारसंघावरील पकड सैल झाली. परिणामी २०१४ आणि २०१९ च्या दोन्ही निवडणुकीत भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. २०१९ मध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांचा तब्बल दोन लाख 80 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता.
लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर असे पाच विधानसंभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील तर नांदेड जिल्ह्यामधील लोहा अशा सहा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. यात पक्षीय बलाबल पाहिले तर महाविकास आघाडीचे प्राबल्य दिसते आहे. पण गेल्या वर्षीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. पक्षीय बळाला गट-गटाने शह देणे सुरु आहे.
काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनीही कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागावे, असे सांगितले, पण उमेदवार मात्र सक्षमच देऊ, अशी केवळ घोषणा केली. पत्रकार परिषद, किंवा आढावा बैठकीत, काही इच्छुक चेहऱ्यांना पुढे घेतले जाईल, असा कयास होता, पण तसे काही झाले नाही. म्हणजे आगामी लोकसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार दृष्टीक्षेपात नाही, पण दुसरीकडे भाजप विद्यमान चेहऱ्यालाच पुढे करत असल्याचे सध्या चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.