

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीने 63 गटांपैकी 52 गटांमध्ये युती करत लढण्याचा निर्णय काल जाहीर केला. सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातील 11 गटांचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडण्यात आल्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले.
तर दुसरीकडे अतुल सावे यांनी मात्र या 11 गटात भाजप मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना-भाजप युती जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडी झाल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जाहीर केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे बहुतांश जागांवर एक मत झाले असून अधिकृत घोषणा आज सायंकाळी करणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. कोण किती जागा लढणार? या आकड्यांच्या भानगडीत आम्ही पडणार नाही. जिथे ज्या पक्षाची ताकद तिथे त्या पक्षाला तो गट आणि गण देऊन टाकायचा हे आम्ही ठरवले आहे. आकड्यांमध्ये गुंतून न पडता मेरीटवर आमचे जागावाटप झाले असल्याचे अंबादास दानवे म्हणाले. महाविकास आघाडी एकत्रितपणे जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काल शिवसेना-भाजपची युती जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पुन्हा नाराजी नाट्य दिसून आले. युती तोडा अशा घोषणा वैजापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या, याकडे अंबादास दानवे यांचे लक्ष वेधले असता शिवसेना-भाजप युती म्हणू नका, खरी शिवसेना आम्ही आहोत शिंदे हा गद्दारांचा गट आहे. नाराजी आणि नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी हा प्रकार भाजपसाठी नवा राहिलेला नाही, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शहरातील देशी दारूची दुकाने शहराबाहेर हलवण्याचा ठराव आणणार असल्याचे काल जाहीर केले. यावर इम्तियाज जलील हे फक्त बोलतात यापूर्वीही त्यांनी दारूची दुकाने बाहेर हलवण्यासाठी आंदोलन केले होते. परंतु देशी दारूची दुकाने त्यांच्या बोलण्याने किंवा आंदोलनाने हटवली जाऊ शकत नाहीत. त्यासाठी काही नियम, कायदे आहेत.
गुटख्या संदर्भातही त्यांनी अशीच घोषणा केली होती परंतु त्याचेही पुढे काही झाले नाही. आजही सर्वत्र गुटखा मिळतोच. त्यामुळे इम्तियाज जलील हे फक्त बोलतात, घोषणा करतात त्यांना यातून नेमकं काय साधायचा असतं? हे मला सांगता येणार नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी एमआयएमलाही फटकारले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.