Chhatrapati Sambhajinagar: 2019च्या लोकसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी 2024च्या निवडणुकीतही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशीही त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या रिंगणात (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha 2024) असले तरी लढण्याच्या मनस्थितीत नसल्याचे चित्र आहे.
सर्वात आधी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षवर्धन जाधव हे सोशल मीडिया आणि प्रचारातही फारसे सक्रिय दिसत नाहीत. राज्यातील प्रत्येक घटना, घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यावर आपली परखड भूमिका मांडण्यासाठी ओळखले जाणारे हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर आठ एप्रिलला शेवटची पोस्ट केली आहे.
जिल्ह्यात कुठेही ते प्रचार करताना दिसत नाहीत, यावरून ते किती ताकदीने लढणार आहेत याचा अंदाज येतो. माझ्याकडे आता काही नाही, पण मी तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहील, अशी भावनिक साद हर्षवर्धन जाधव लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याच्या आधीपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना घालत होते.
मराठा आरक्षणाचा मुद्दा याही निवडणुकीत आपल्या उपयोगी पडेल, असा त्यांचा कयास होता. परंतु 2019 मधील परिस्थिती आणि विद्यमान घडामोडी यात बरेच अंतर आहे. गेल्या वेळी चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात हर्षवर्धन जाधव यांना मोठी रसद खैरेंच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून मिळाली. युती असूनही भाजपच्या काही नेत्यांनी विरोधात काम केल्याचा फायदा जाधव यांना झाला होता.
तब्बल दोन लाख 83 हजार मते मिळवून त्यांनी शिवसेनेच्या खैरेंच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. यात कुठेही स्पर्धेत नसलेल्या इम्तियाज जलील यांची मात्र लॉटरी लागली होती. यावेळी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू असताना हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्टपणे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याचा नसून केंद्र सरकारच्या हातातअसल्याचे सांगितले.
मराठा आरक्षण टिकवायचे असेल तर 50 टक्क्यांची मर्यादा हटवणे हा एकमेव पर्याय असून त्यासाठी संसदेत कायदा करावा लागेल, अशी भूमिका जाधव यांनी वारंवार मांडली. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले पण जाधव भूमिकेवर ठाम राहिले. मात्र लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करूनही त्यांना म्हणावा तसा पाठिंबा मिळताना दिसत नाही.
याशिवाय आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे जाधव निवडणुकीत फारसे सक्रिय नसल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या जाधव यांच्या ट्रॅक्टरचा फॅक्टर जोरात चालला होता. या वेळी मात्र जाधव फॅक्टर अडगळीत पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे जाधव यांच्या उमेदवारीची दखल कुठलाच राजकीय पक्ष घ्यायला तयार नाही. समाज माध्यम आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रचारातही हर्षवर्धन जाधव कुठेही दिसत नसल्याने त्यांनी ही निवडणूक सोडली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.