Chhatrapati Sambhajinagar News : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार चौथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक होणार आहे. निवडणूका आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानूसार छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी 18 एप्रिल, रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल असणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 26 एप्रिल रोजी होऊन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल असणार आहे. यानंतर 13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान आणि 4 जून रोजी संपुर्ण देशातील एकत्रित मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच मतदान करणारे तब्बल 41 हजार नवमतदार हे गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
वयवर्षे 18 ते 19 या वयोगटातील म्हणजेच नवमतदारांची संख्या ही 41 हजार 465, 20 ते 29 वर्षे वयोगटातील-6 लाख 23 हजार 491, 30-39 वयोगटातील -7 लाख 55 हजार 611, 40-49 वयोगटातील-6 लाख 33 हजार 58, 50-59 वयोगटातील-4 लाख 68 हजार 7, 60-69 वयोगटातील 2 लाख 75 हजार 1, 70-79 वयोगटातील-1 लाख 51 हजार 474 तर 80 व त्यापेक्षा अधिक वयोगटातील -84 हजार 439 असे एकूण 30 लाख 32 हजार 546 मतदार आहेत.
जिल्ह्यात 18 जालना आणि 19 औरंगाबाद अशा दोन लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यात जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ क्षेत्र जालना लोकसभा मतदारसंघास जोडलेले असून औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड हे विधानसभा मतदार संघ क्षेत्र औरंगाबाद लोकसभा मतदार संघास जोडलेले आहेत. त्यात जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या क्षेत्रासाठी 1045 तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या क्षेत्रासाठी 2040 असे एकूण 3085 मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 37 लक्ष 1 हजार 282 इतकी असून सन 2024 ची अनुमानित लोकसंख्या 45 लक्ष 89 हजार 322 इतकी आहे. या लोकसभा मतदार संघासाठी जालना लोकसभा मतदार संघासाठी 9 लाख 97 हजार 523 तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी 20 लाख 35 हजार 23 असे एकूण 30 लाख 32 हजार 546 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
निवडणूक काळात (Election Commision) जिल्ह्यात पोलीस आयुक्त (Police) हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व निर्भयतेचे वातावरण राखण्यासाठी पोलीस दलाची सज्जता असून त्यासाठी मतदान केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. जिल्ह्यात अतिरिक्त बंदोबस्तासाठी राज्यराखीव दलाच्या तीन तुकड्या तर केंद्रीय राखीव दलाच्या दोन तुकड्या प्राप्त होणार आहेत. तसेच संवेदनशील व जोखमीच्या मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची तात्काळ दखल घेण्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली असून 1950 टोल फ्री क्रमांक, 94 स्थिर सर्व्हेक्षण पथके, तसेच फिरते सर्व्हेक्षण पथके यांच्या माध्यमांतून ग्रामिण भागापासून शहरी भागापर्यंत प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी नागरीकही सी व्हिजील या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात, असे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.