लोकसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या परीने तयारीही सुरू केली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातून कधीकाळी राज्याचे राजकारण हाताळणाऱ्या काँग्रेस पक्षाचे सध्या या शहराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काँग्रेसला खासदार, आमदार आणि मंत्री देणाऱ्या या जिल्ह्यात त्यांची पाटी अक्षरशः कोरी आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार, खासदार नाही. 2004 पासून काँग्रेसला शहरातून एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. यापेक्षा लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) काँग्रेसची वाईट अवस्था आहे. 1998 मध्ये रामकृष्णबाबा पाटील हे काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले होते. तेव्हापासून जिल्ह्यात काँग्रेसला जी उतरती कळा लागली ती अजूनही सुरूच आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात 1967 ते 85 चा काळ हा काँग्रेससाठी सुवर्ण असा होता. तेव्हाच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे रफिक झकेरिया, अब्दुल अझीम, अमानउल्ला मोतीवाला यांनी विधानसभेत काँग्रेसचे नेतृत्व केले होते. त्यानंतर शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला होता.
1999 व 2004 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ काँग्रेसने (Congress) खेचून आणला. पण त्यानंतर सलग तीन टर्म शिवसेनेच्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी या मतदारसंघात विजय मिळवत काँग्रेसवर मात केली. अशीच काहीशी परिस्थिती लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसची झाली. 1952 ते 71 या दरम्यान, या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. सुरेश चंद्रा, स्वामी रामानंद तीर्थ, भाऊराव देशमुख, माणिकराव पालोदकर, काझी सलीम, रामकृष्ण बाबा पाटील यांनी लोकसभेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
1998 नंतर मात्र काँग्रेसला या मतदारसंघात पुन्हा विजय मिळवता आला नाही. सातत्याने विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभव वाट्याला येत असल्याने काँग्रेसच्या राज्य व देश पातळीवरील नेत्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, लोकसभा, विधानसभेसाठी प्रभारी नेमून पक्षाने केवळ सोपस्कार पार पाडण्याचे काम केले.
परिणामी काँग्रेसला मोठ्या निवडणुकीत यश मिळू शकले नाही. आता सगळे राजकीय पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना काँग्रेसची छत्रपती संभाजीनगरकडे पाहण्याची दृष्टी काही बदललेली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
तर आता महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेच्या निवडणुका लढवत आहे. आघाडीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसने इथे फारसे लक्ष दिलेले नाही. काँग्रेसच्या विभागीय बैठकीसाठीही लातूरला पसंती देण्यात आली. एकंदरित काँग्रेस ज्या जिल्ह्यातून पक्षाला यश मिळत नाही, त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.