

संभाजीनगरात शिवसेनेतील गटबाजी आणि सत्तासंघर्ष वाढल्याने एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप केला आहे.
पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
स्थानिक नेतृत्वावर आरोप होत असून यामुळे पक्षात अंतर्गत तणाव वाढला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर शिवसेनेतील गटबाजी, नेत्यांमधील सत्ता स्पर्धा आणि पक्षाची विस्कटलेली घडी नीट बसवण्याची जबाबदारी पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. जिल्ह्यात सहा आमदार, एक खासदार, महापालिकेत 13 नगरसेवक आणि झेडपीत 21 सदस्य अशी मोठी ताकद आहे. पण भाजपचे धूर्त राजकारण आणि शिवसेनेच्या स्थानिक मंत्री, खासदार, आमदार यांच्या वर्चस्व वादाच्या संघर्षातून पक्षाचे मोठे नुकसान झाले.
महापालिकेत, उपमहापौर पदावर बोळवण झाल्यानंतर झेडपीत तर भाजपने आपल्या मित्र पक्षाला थेट विरोधी पक्षातच बसवले. जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्थानिक म्हणून संजय शिरसाट यांच्यावर मोठ्या विश्वासाने एकनाथ शिंदे यांनी सोपवले. पण शिरसाट यांनी मुलगा, मुलगी आणि समर्थकांनाच झुकते माप दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला.
रविवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या जालना-छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिकांनी सजय शिरसाट यांना टार्गेट केले होते. महापालिका निवडणुकीत फक्त मुला-मुलीच्या प्रचारासाठी वेळ दिला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दुर्लक्ष केले, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेट देत नाहीत, त्यांची कामे करत नाहीत, बंगल्यावर योग्य वागणूक दिली जात नाही, असा तक्रारींचा पाढाच श्रीकांत शिंदे यांच्यासमोर वाचण्यात आला.
राजेंद्र जंजाळ यांनीही मला आणि माझ्या प्रभागातील काही उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न आणि त्यांना रसद पुरवली गेल्याचा थेट आरोप केल्याने संजय शिरसाट कमालीचे अस्वस्थ झाल्याचे पहायला मिळाले. आपल्या उत्तरात त्यांनी आरोप करणाऱ्यांना खोटे ठरवत तुम्ही मुंबईतून लोकांना पाठवा आणि खरं खोटं काय? हे तपासा असे, म्हणत शिरसाट यांनी वेळ मारून नेली. एकूणच काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत संजय शिरसाट हे व्हिलन, तर खासदार संदीपान भुमरे हे हिरो ठरल्याचे दिसून आले.
संजय शिरसाट यांच्याविरोधातील तक्रारींचा सूर ऐकल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात खासदार संदीपान भुमरे यांच्याकडून शिका, लोकांची कामे कशी करायची, त्यांना कसे भेटायचे? माझ्या कानावर सगळ्या गोष्टी आल्या आहेत, मी एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे, असे सांगत शिरसाट यांचे टेन्शन अधिकच वाढवले. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांकडे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार हे बारकाईने लक्ष देत होते. तेही शिरसाट यांच्याविरोधात संधीच्या शोधात आहेत.
एकनाथ शिंदेंना लक्ष घालावे लागेल..
छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि मराठवाड्याची शान म्हणून ओळखला जातो. पक्ष फुटीनंतर सर्वाधिक ताकद एकनाथ शिंदे यांना याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने दिली. निधीच्या माध्यमातून त्यांनीही पक्षाला आर्थिक ताकद दिली. परंतु राजकीय वर्चस्वातून गेल्या वर्षभरात पक्षात गटबाजी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. संजय शिरसाट यांचा कारभार हा एकला चलो रे सारखा राहिला, तर शहर आणि जिल्ह्यातील इतर आमदारांचा त्यांच्याशी फारसा समन्वय कधी दिसून आला नाही.
खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, प्रा. रमेश बोरनारे यांनी संघटनेपेक्षा आपापले मतदारसंघ सांभाळण्यात धन्यता मानली. परिणामी जिल्हा पातळीवर संघटनेत गटबाजी बळावली. महापालिकेत पक्षाची कामगिरी खालावली याला अर्थातच संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल या शहरी आमदारांना दोषी धरावे लागेल.
तर जिल्हा परिषदेत भाजपाच्या बरोबरीने सदस्य स्वबळावर निवडून आल्यावरही शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले. याची सल स्थानिक नेत्यांपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष फुटीनंतर जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले. त्याचा फटका या पक्षाला महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसला. तर दुसरीकडे चांगली ताकद असूनही केवळ सगळी जबाबदारी पालकमंत्र्यांवर सोपवून दुर्लक्ष केल्याने शिवसेना आज जिल्ह्यात बॅकफुटवर गेली आहे.
उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती एकनाथ शिंदे यांनी करू नये, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली असली तरी एकनाथ शिंदे यांनीही संभाजीनगरमध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात शिवसेनेचे परिस्थिती अधिक बिकट होईल, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही.
1. ही घटना कुठे घडली आहे?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही राजकीय घडामोड घडली आहे.
2. कोणाला जबाबदारी देण्यात आली आहे?
श्रीकांत शिंदे यांच्यावर पक्षाची घडी बसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
3. पक्षात काय समस्या आहे?
गटबाजी, सत्तासंघर्ष आणि नेत्यांमधील वर्चस्वाची लढाई सुरू आहे.
4. कोणावर आरोप झाले आहेत?
संजय शिरसाट यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोप करण्यात आले आहेत.
5. याचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो?
पक्षाची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता असून नेतृत्वावर दबाव वाढू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.