

Latur News: : महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यातही दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. अनेक भागात कृत्रिम पावसाचा प्रयोगही राबवला. ही तत्परता काँग्रेस नेतृत्वाकडेच आहे, अशा शब्दांत डी. के. शिवकुमार यांच्यावर काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते व माजी आमदार धीरज देशमुख यांनी स्तुतीसुमने उधळली. अशीच तत्परता आम्हाला महाराष्ट्रातील सरकारकडून अपेक्षित आहे, असा टोला देशमुख यांनी फडणवीसांनी लगावला.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या लातूर तालुक्यातील विविध गावातील पिकांची पाहणी करून देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, जशी आपल्याकडे दुष्काळ सदृश्य स्थिती आहे, तशीच कर्नाटक राज्यात आहे. पण तिथल्या सरकारने अतिशय तत्परतेने पावले उचलली आणि अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला वेळेत मदत करण्याचा निर्णय घेतला. अतिशय संवेदनशीलपणाची अशी ही बाब आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारनेही तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे, असे आम्हाला वाटते.
मराठवाड्यातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून, शेतातील उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे केवळ हिरवे पालवे दिसत असून शेंगा भरलेल्या नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या हातात येणारा घासही हातातून निसटला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी.
नुकसानीमुळे 'तो' आधारही अपुरा
गेल्या वर्षी लातूरसह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पीकविमा, अतिवृष्टीचे पॅकेज आणि इतर माध्यमातून मदत जाहीर करण्यात आली; मात्र अनेक शेतकऱ्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. आता पुन्हा यंदाचे पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कर्जमाफीची घोषणा झाली, अनुदान देण्याची घोषणा झाली. काही शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अंशतः लाभ मिळाला असेल; मात्र सध्याच्या पीक नुकसानीमुळे तो आधारही अपुरा ठरणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
शेतकऱ्यांवर एकीकडे नैसर्गिक संकट आलेले असताना दुसरीकडे शासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदतीची कार्यवाही करावी.
-धीरज देशमुख, माजी आमदार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.