Chhatrpati sambhajinagr News : महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणुकीचे राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस मराठवाड्यासह राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघांत लढणार असल्याची माहिती आहे. यात मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघासह जालना, लातूर आणि नांदेड या चार जागांचाही समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाकडे असलेली हिंगोलीची जागा काँग्रेसला आणि त्याबदल्यात जालन्याची जागा ठाकरे गटाला दिली जाणार अशी चर्चा होती. अगदी संभाव्य उमेदवारांची नावेही समोर येऊ लागली होती, परंतु यात तथ्य नसल्याचे आता समोर आले आहे. काँग्रेसने आपला हिंगोलीवरचा दावा कायम ठेवत जालन्याची पारंपरिक जागाही स्वतःकडेच ठेवली आहे. या संदर्भात उद्या मुंबईत काँग्रेस प्रदेश कार्यालयात बैठक होत आहे. (Marathwada Congress News )
या बैठकीत राज्यातील सर्व 19 लोकसभा मतदारसंघांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या बैठकांमध्ये त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आग्रह धरला होता. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाचा आहे, परंतु हिंगोलीच्या बदल्यात ठाकरे गटाला जालना लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली होती.
अनेक बैठकांमध्ये या प्रस्तावावर आघाडीच्या नेत्यांची चर्चाही झाली. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आणि जागावाटपाचे सगळे सूत्रच बदलले. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे आता काँग्रेस हिंगोलीवरचा दावा सोडेल, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. एवढेच नाही तर जालन्याची जागा ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाला असून, माजी आमदार शिवाजी चोथे तिथून उमेदवार असतील, अशा चर्चांनाही उधाण आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसच्या वतीने राज्यातील ज्या 19 जागांवर उद्या टिळक भवनात महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यात हिंगोलीच्या जागेचाही समावेश आहे. त्यामुळे हिंगोलीऐवजी जालना लोकसभा मतदारसंघाची काँग्रेस-ठाकरे गटात अदलाबदल झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जालना लोकसभा मतदारसंघाची जागा गेल्या 30-35 वर्षांपासून काँग्रेसकडे आहे.
शिवसेना-भाजप युतीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा कायम ठाकरेंच्या शिवसेने लढवलेली आहे. सध्या शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यबाण चिन्हावरच लोकसभेवर निवडून गेले होते. त्यामुळे ठाकरे गटाने हिंगोलीची जागा सोडण्यास नकार दिला होता, परंतु काँग्रेसच (Congress) इथून लढणार असल्यामुळे मग शिवसेना ठाकरे गटाला काँग्रेस दुसरा कुठला मतदारसंघ देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
(Edited By : Sachin Waghmare)