

Beed Politics : शिवसेनेने पक्षातून काढल्यापासून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर पक्षाविना आहेत. पण काही दिवसांपासून त्यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. आता ते बीड नगरपालिकेत भाजपसाठी प्रचार करत आहेत. सोमवारी (1 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर असल्याने त्यांच्या उपस्थितीत क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश होईल असे वाटत होते.
मात्र, त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी क्षीरसागर उपस्थित राहिले. पण गुलाब देऊन, स्वागत करून ते गायबही झाले. पण काही मिनिटांच्या भेटीत दोघांनी एकमेकांशी कानगोष्टी आवर्जून केल्या. जयदत्त क्षीरसागर व्यासपीठावरही नाहीत अन् त्यांचा प्रवेशही नाही. पण भाजपच्या निवडणूक रणनीतीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग दिसून येत आहे.
चार दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंच्या बीडमधील प्रचार सभा आणि मेळाव्यांतही जयदत्त क्षीरसागर नव्हते हे विशेष. त्यामुळे फडणवीस आणि क्षीरसागर एकमेकांच्या कानात नेमकं काय बोलले? आणि भविष्यात क्षीरसागर स्वत:साठी कोणता राजकीय ट्रॅक निवडणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जयदत्त क्षीरसागर पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात आले. पुढे विधानसभेत एंट्री करत त्यांनी अगोदर काँग्रेस व नंतर स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. उपमंत्री ते कॅबीनेट मंत्री पदावर काम करताना महत्वाची खातीही सांभाळली. 2014 ते 2019 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंचे महत्व आणि जयदत्त क्षीरसागरांची अस्वस्थता वाढत होती. 2014 च्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते एकमेव विधानसभेचे आमदार होते. मात्र, पक्षातील विरोधक त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ देत असल्याने अस्वस्थ जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवाराच्या विरोधात थेट भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांचा प्रचार केला.
त्यातच तौलिक महासभेचे राष्ट्रीय पदाधिकारी असल्याने त्यांचे पंतप्रधान मोदींसोबतचे फोटोही सोशल मिडीयावर असत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संपर्क आणि तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सलोखा असल्यामुळे क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करतील असे चित्र होते. पण, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत या उक्तीप्रमाणे त्यांनी हाती शिवबंधन बांधले. त्यांना शिवसेनेने मंत्रीपद आणि पक्षाची विधानसभेची उमेदवारीही दिली. मात्र, त्यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडूनच पराभव पत्करावा लागला.
त्यानंतर पालिकेतील कामांच्या भूमिपुजनाच्या कारणावरुन त्यांच्यावर शिवसेनेने कारवाई केली. त्यामुळे त्यांनी मागच्या विधानसभेतही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन काढूनही घेतला. आता नगर पालिकेच्या तोंडावर पुन्हा त्यांच्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. पण, पुर्वी असलेले मुंडे - क्षीरसागर सख्य आता राहीले नव्हते. त्यामुळे चर्चा असलेला त्यांचा प्रवेश कोणत्याच पक्षात झाला नाही. आता जयदत्त क्षीरसागर नगर पालिकेत भाजपसाठी प्रचारही करत आहेत. मात्र, प्रचाराच्या वाहनांवरील बॅनरवर त्यांचे छायाचित्र नाही. सभेच्या ठिकाणी आणि काही नगरसेवकांनी स्वत: लावलेल्या बॅनरवर त्यांचे छायाचित्र दिसते.
दरम्यान, या घडामोडींच्या काळात दोन महत्वाच्या घटना नजरेतून सुटत नाहीत. चार दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंचा बीडमध्ये प्रचार दौरा झाला. या दौऱ्यात आणि त्यांच्या सभांना जयदत्त क्षीरसागर उपस्थित नव्हते. तसेच, आज मुख्यमंत्री आले तेव्हा त्यांनी स्वागत केले. पण, सभेलाही ते उपस्थित नव्हते आणि त्यांचा प्रवेशही झाला नाही. मुख्यमंत्रयांनी त्यांच्या कानात नेमके सांगीतले काय? आणि आता क्षीरसागर स्वत:साठी कोणता राजकीय ट्रॅक निवडणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.