मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर घातपाताच्या चौकशीतून दूर राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे लोटांगण घालण्याचा गंभीर आरोप केला.
या आरोपामुळे मराठा आंदोलन आणि राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तणावपूर्ण बनले आहे.
मुंडे आणि राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Jalna Politics News : धनंजय मुंडे आणि त्याचे टोळीने मला मारण्याचा कट रचला होता. जेवणात विष कालवून किंवा अंगावर गाडी घालून ते मला संपवायला निघाले होते. आता तोच धनंजय मुंडे तुमच्या पायाशी लोळन घेऊन मला घातपाताच्या चौकशीपासून टाळा म्हणतो आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला वाचवू पाहत आहेत. त्याला क्लीन चीट देण्यात येत आहे. धनंजय मुंडेला वाचवून त्याच्या पापाचे भागीदार तुम्ही होऊ नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस, पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
मला संपवण्याच्या कटात धनंजय मुंडे याचा सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. बीडचा एक आणि अटकेत असलेले दोन आरोपी यांच्यात रेस्ट हाऊसला बैठक झाली, यांचे फोन रेकाॅर्डिंग आहे. मग धनंजय मुंडे याला अजित पवार, फडणवीससाहेब चौकशीला का बोलवत नाहीत? मग तुमचाही या घातपातामध्ये हात आहे का? अशी शंका आम्ही घ्यायची का? असा सवाल करत जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारने आपले संरक्षण तातडीने काढून घ्यावे, तसा अर्जच आपण आज किंवा उद्या पोलीस अधीक्षकांकडे करणार आहोत. मला तुमच्या संरक्षणाची गरज नाही.
माझा मराठा समाज आणि मी स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. शिवाय मला मारण्यासाठी धनंजय मुंडे आणि त्याच्या लाभार्थी टोळीला मोकळं मैदान मिळालं पाहिजे, आजपासूनच तुमचे पोलीस संरक्षण काढून घ्या, अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यापासून धनंजय मुंडे हे फरार आहेत, म्हणजेच ते अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांकडे जाऊन आपल्याला या चौकशीपासून टाळा, अशी विनवणी करत असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आपल्या हत्येच्या कटामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा जाहीर आरोप केला तेव्हापासून मुंडे विरुद्ध जरांगे पाटील यांच्यात संघर्ष भडकला. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि संशयित आरोपीमध्ये झालेल्या फोनवरील संवादाच्या रेकाॅर्डिंग माध्यमांसमोर आणत धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. धनंजय मुंडे यांनी आपली, मनोज जरांगे पाटील व अटकेत असलेल्या आरोपांची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करा आणि प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून होऊ द्या, असे म्हणत जरांगे यांचे आरोप फेटाळले होते.
परंतु मुंडेंकडून ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्टची मागणी होताच मनोज जरांगे पाटील यांच्या मार्फत पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे यासाठी अर्ज करण्यात आला. धनंजय मुंडे मात्र या विषायवर नंतर काहीच बोलले नाही. मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार त्यांना आव्हान देत ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टला चला, असे आवाहन दिले. या आव्हान-प्रतिआव्हानाला आठवडा उलटत नाही तोच आता जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोप केला.
मुंडेला क्लीन चीट देऊ नका..
धनंजय मुंडे एका समाजाच्या गरीब पोराच्या जीवावर उठला आहे, त्याचे अटकेत असलेल्या आरोपीसोबत फोनवरचे संभाषण रेकाॅर्ड झालेले आहे. मग पोलीसांनी त्याचे टाॅवर लोकेशन का तपासले नाही? आतापर्यंत धनंजय मुंडे याला चौकशीसाठी बोलवून अटक का केली नाही? असा प्रश्न उपस्थितीत केला. मला आता अशी माहिती कळाली आहे, की धनंजय मुंडे गेल्या आठ दिवसापासून फडणवीससाहेब आणि अजित पवार यांच्याकडे जाऊन मला या घात पाताच्या चौकशी पासून टाळा म्हणून लोटांगण घालायला गेला होता.
फडणवीस आणि अजित पवारांनीही त्याला चौकशीपासून दूर ठेवण्याचे आश्वासन देत वाचवले आहे. त्याला क्लीन चीट दिली आहे, असा आरोप केला. आता मला तुमचे कुठलेही पोलीस संरक्षण नको, तुमचे पोलिस काढून घ्या. माझा तुमच्यावर आणि तुमच्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही. मला संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीला मोकळ रान मिळू द्या. मी आणि माझा समाज स्वतःचे सरंक्षण करायला समर्थ आहोत, असे सांगत पवार आणि फडणवीस साहेब तुम्ही चुकीचं वागत आहात.
धनंजय मुंडे याला वाचवून त्याच्या पापाचे भागिदार तुम्ही बनू नका. मराठा आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हापासून मी सरकारविरोधात किंवा फडणवीस, पवार, शिंदे यांच्याविरोधात एक शब्दही बोललो नव्हतो. पण जो मला संपवायला निघालायं, त्यालाच जर तुम्ही वाचवत असाल तर याचे परिणाम तुम्हाला 2029 आणि मधल्या काळतही भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
1. मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर नेमका कोणता आरोप केला?
त्यांनी मुंडेंवर घातपात चौकशीपासून वाचण्यासाठी सत्ता नेतृत्वाकडे आश्रय घेतल्याचा आरोप केला.
2. घातपाताची चौकशी कोणत्या संदर्भात आहे?
मराठा आंदोलनाशी संबंधित एक गंभीर घटना ज्याची चौकशी प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.
3. सरकारची या आरोपांवर प्रतिक्रिया काय आहे?
सद्यस्थितीत कोणतीही ठोस सरकारी प्रतिक्रिया उपलब्ध नाही.
4. या वादामुळे राजकीय वातावरणात काय बदल झाले आहेत?
सरकार आणि आंदोलक यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याचे दिसते.
5. धनंजय मुंडेंनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे का?
धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.