धनंजय मुंडेंनी डॉ. संपदा मुंडे प्रकरणात थेट पाच-सहा नेत्यांवर एका जातीला बदनाम केल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी स्पष्ट केलं की, बीड जिल्ह्याला आणि एका समाजाला हेतुपुरस्सर राजकीय फायद्यासाठी बदनाम करण्यात आलं.
त्यांच्या या विधानामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.
Beed News : बीड जिल्ह्यातील कवडगावच्या डाॅ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. संपदा यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत कुटुंबियासह जिल्ह्यातील नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीकडून चौकशीची मागणी केली आहे. आमदार धनंजय मुंडे यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत असे प्रकार मी सहन करणार नाही, असा इशारा दिला. आज कवडगाव येथे धनंजय मुंडे यांनी संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना आधार दिला. कुठल्याही परिस्थितीत आरोपी सुटणार नाही, असा शब्द यावेळी त्यांनी दिला.
मुंडे कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोणालाही सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. माध्यमांशी बोलताना बीडच्या या बहीणीला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे सांगत या घटनेचा अधिक तपशील समोर आणला. बीड जिल्ह्यातील असल्यामुळे डाॅ. संपदा यांना हिणवण्याचा प्रकार सुद्धा समोर आला आहे. ठराविक जातीच्या त्या असल्यामुळे त्यांना त्रास दिला गेला. आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलीय का? की ही हत्या आहे हा भाग पोलिसांच्या तपासामध्ये येईल.
काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी जिल्ह्याला बदनाम केलं. त्यावेळेस बीड जिल्ह्यातील प्रत्येक जात, जमात, अठरा पगड जातीची पोरं बाहेर शिकायला आहेत. त्यांना याचा त्रास होईल, याचा कोणी केला नाही. आणि आज तोच प्रकार समोर आला. संपदा यांना या सगळ्याचा त्रास झाला. गोव सोडून कोसो किलोमीटरवर आपलं पोट भरणारे लोक किती हिणवण्या सहन करत असतील याचा आज त्यांनी विचार करायला पाहिजे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता टीका केली.
एवढेच नाही याबाबत मला पोलिसांना प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली किती किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली? कशी पीएमसाठी पाठवली इथपासून सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. संपदा यांच्या हातावर लिहिलेले अक्षर हे तिचे नव्हतेच असं त्यांच्या बहीणीचे म्हणणे आहे. एक बहीण आपल्या बहिणीचे हस्ताक्षर ओळखू शकत नाही का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. या ठिकाणी माझी आणखीन एक मागणी आहे की, या दरम्यान तिथे जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.
संपूर्ण चौकशी होऊन आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. संपदा मुंडे यांना अतिशय कष्टातून शिकवून आपल्या लेकराला डॉक्टर बनवून जीवन दानाच्या कार्यास समर्पित केलेल्या माता पित्याच्या व कुटुंबियांच्या भावना व त्यांचे शब्द हृदय हेलावून टाकणारे आहेत. कुटुंबीयांनी डॉ. संपदाच्या मृत्यू बाबत उपस्थित केलेले काही प्रश्न हे देखील मृत्यू व त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी हे संशयास्पद आहे.
बीडच्या म्हणून हीन वागणूक..
डॉ. संपदा यांच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करणाऱ्या सोबतच त्यांना आपल्या कर्तव्यात चुका करून बनावट रिपोर्ट देण्याबाबत दबाव टाकून उलट त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात अडकवणारे लोक देखील तिच्या मृत्यूस जबाबदार आहेत. मागील काही महिन्यांपासून ठराविक लोकांनी बीड जिल्ह्याची जी बदनामी केली, त्यातून आपले पोट भरायला किंवा शिकायला जे लोक जिल्ह्याच्या बाहेर राहतात, त्यांना जी उपेक्षा आणि हीन वागणूक दिली जातेय, त्या त्रासाचा सुद्धा ही आमची बहीण एक बळी ठरली आहे.
डॉ. संपदाच्या तक्रारी, त्यावरील चौकश्या, त्यातील जबाब, अहवाल, स्थानिक पोलिसांची सुरुवातीपासूनची त्रासाची भूमिका, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेला हलगर्जीपणा या सर्वच गोष्टींचा निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. शिवाय अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठीही एक उदाहरण प्रस्थापित करणे गरजेचे आहे. या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून डॉ. संपदाच्या सर्व दोषींना कठोर शासन केले जावे व मुंडे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी सर्व कुटुंबीयांना दिले.
डॉ. संपदा मुंडे प्रकरण नेमकं काय आहे?
– मुळच्या बीड जिल्ह्यातील कवडगावच्या डाॅ.संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पोलीसांच्या दबावातून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. .
धनंजय मुंडेंनी कोणावर आरोप केला?
– त्यांनी पाच-सहा स्थानिक नेत्यांवर एका जातीला हेतुपुरस्सर बदनाम केल्याचा आरोप केला.
या वक्तव्यावर बीडमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या?
– समर्थकांनी मुंडेंचं समर्थन केलं तर विरोधकांनी आरोप फेटाळले; राजकीय वाद तीव्र झाला आहे.
या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
– बीड जिल्ह्यातील आगामी निवडणुकांवर या वादाचा मोठा प्रभाव पडू शकतो.
डॉ. संपदा मुंडे कुटुंबियांची मागणी काय आहे?
– या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करून आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.