jitendra Awhad In Aurangabad
jitendra Awhad In AurangabadSarkarnama

आव्हाडांच्या अभ्यासू भाषणाची मराठवाडा साहित्य संमेलनात चर्चा!

(marathwada sahitya sammelan)आव्हाडांनी आपल्याच मायभुमीत रुळलेल्या, (Jitendra Awhad) खेळलेल्या व आपल्याकडून उपेक्षित, झालेल्या उर्दुबद्दलही धाडसी भाष्य केले.

औरंगाबाद ः औरंगाबादेत झालेल्या ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत रविवारी (ता. २६) समारोप झाला. सायंकाळी पाच वाजले सभागृहात रसिकजण प्रमुख पाहुणे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची वाट पाहत होते. मंत्री साहित्यिक वर्तुळात भाषण करायला आले तरी त्यांची नेहमीची स्टाईल ठरलेली असते. एक-दोन घोषणा करून मराठी भाषेसाठी सरकार काय करत आहे, याचे पाढे वाचले जातात आणि हे मंत्री निघून जातात. आव्हाड हे कोणती विचारधारा घेऊन वावरतात, याची जाणीव उपस्थितांना असल्याने ते काय बोलतील याची उत्सुकता रसिकांसह पत्रकारांनाही होती.

सभागृहातील संत जनाबाई विचारपीठावर जेव्हा ते बोलण्यासाठी उभे राहीले तेव्हा सभागृहात टाचणी पडावी अन् आवाज यावा अशी स्थिती होती. साहित्य संमेलनात ते मराठी, मराठी साहित्य, मराठवाडा व एकुणच सारस्वतांबद्दल भरभरुन बोलले, जेथे वाटले तेथे त्यांच्या तडाखेबंद शैलीत टिकाही केली. सुमारे ४० मिनिटे ते दिलखुलासपणे भरभरुन बोलले. राजकारण्यांचा व्यासंग मोठा नाही हे एकीकडे सांगतानाच त्यांनी विचारपीठावर समर्पक मुद्दे मांडले.

साहित्य संमेलन मराठी भाषिकांचे होते. त्यामुळे मायमराठीचा जयजयकार होणारच. त्याशिवाय इतर भाषा भगिनींबाबत कोण बोलणार? परंतु आव्हाड एकमेव असे होते की, त्यांनी मराठीचा जयजयकार करतानाच सारस्वतांसमोर आपल्याच मायभुमीत रुळलेल्या, खेळलेल्या व आपल्याकडून उपेक्षित, ‘नजरअंदाज’झालेल्या उर्दुबद्दलही धाडसी भाष्य केले. मराठवाडा व उर्दूचे नाते, तिचा लहेजा, उर्दुसाठी मराठवाड्याचे योगदान, उर्दूतून झालेले लिखाण यावर अगदी स्पष्ट मते मांडली.

(विचारपीठावर बसलेल्यांपैकी काहींना कदाचित आवडलेही नसेलही) उर्दू ही समस्त भारतीयांची भाषा आहे, ती एका विशिष्ट समाजालाच आपण बहाल केली ही खंतही त्यांनी व्यक्त केली. यावरुन आपण केवळ प्रांतीय भाषावादात अडकुन चालणार नाही. प्रत्येक भारतीय भाषांचा सन्मान व्हावा, नव्हे ती टिकण्यासाठी योगदानही द्यायला हवे, हे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. मराठवाड्याला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले. हा प्रदेश जुलमी निजामी राजवटीत होता. अत्याचार व अन्याय या भूभागाने सहन केला.

स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाबद्दल बोलतानाच आजही निजामी विचारांच्या लोकांना निवडून दिले जाते, ही शोकांतिकाही त्यांनी व्यक्त केली. एका अर्थाने त्यांनी एमआयएमवर टीका केली. त्याही पलिकडे जाऊन धर्मांमध्ये अंध झालेले विचार हे समाजाला नाशाकडे नेतात, गुलाम बनवितात तरीही आपण अशांना महत्व देतो असे शल्यही त्यांनी बोलून दाखविले. साहित्याबद्ल बोलताना सद्य:स्थितीत साहित्याची ताकद कुठेतरी कमी झाल्याचे त्यांना वाटते. राजकारण हेही कारण ते स्पष्टपणे नमूद करतात.

प्रागतिक विचारांची गरज, चळवळी संपल्याबाबतचे त्यांचे विधान हे हल्ली वास्तवाचा सारासार विचार न करता मोबाईलमध्ये व व्हाॅटस्ॲप विद्यापीठात व्यस्त राहणाऱ्या ‘स्वःत्व’व ‘सत्व’विसरत जाणाऱ्या भावी पिढ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे असल्याचे ते सांगतात. समाजात या गोष्टींमुळे ग्रहण लागत असून हे गांभीर्य नोंदवितानाच अशा पिढीवर फुले, शाहु, आंबेडकर विचारांचे संस्कार व्हावे. वैचारीक वर्ग निर्माण व्हावा, विवेकी समाज घडविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली.

jitendra Awhad In Aurangabad
दिवंगत मुंडे ज्या हॉटेलात चहा घ्यायचे तिथे पंकजा मुंडेंनीही घेतला

मराठवाड्याबद्दल बोलताना त्यांनी येथील चालिरीती, संस्कृती व संत, साहित्याबद्दल त्यांचे सूक्ष्म निरीक्षण चपखलपणे नोंदविले. वर्तमान विकास पद्धतीवर भाष्य करताना त्यांनी मलिक अंबरने सोडविलेला पाण्याचा प्रश्‍न असो की, यादवांनी मराठीबद्दल केलेले अतुलनिय कार्य याचे दाखले देत विकासाचा वस्तुपाठ कसा असावा, हेही दाखवुन दिले. भाषणाला मराठाडा मुक्तीसंग्राम, त्यासाठीचा संघर्ष, जातीव्यवस्था, देशातील कलुषित वातावरण, अभिव्यक्ती, साहित्य, संस्कृती, संतपरंपरेसह सामाजिक, राजकीय, मुल्यांचे व मौलिक विचारांचे कंगोरे होते.

या सर्व पातळीवर त्यांनी निवडक व महत्वाचे संदर्भ दिले. संमेलनात न मांडलेल्या मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, त्यानंतर त्यांनी पंधरा दिवस तयारी केली. विशिष्ट धाटणीचा स्वभाव व व्यक्तीरेखा असलेल्या या व्यक्तीमत्वाची शैलीही तेवढीच निराळी... म्हणुनच तयारीने आणलेले भाषण ‘डायस’वर तसेच होते. त्याचा संदर्भ न घेता त्यांनी आपल्या खुमासदार व स्पष्टशैलीत सभागृहावर पकड मिळविली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com