VBA News : डबलगेम ! अपक्ष, वंचितकडून असे दोन अर्ज भरले; कुठलाही राजकीय स्टंट नाही..

Political News : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघात तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीतून पाठिंबा जाहीर केला होता. या दोन्ही मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार पडली.
Afsar Khan
Afsar Khan Sarkarnama

Chhatrpati SambhajiNagar News : आधी अपक्ष आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून एबी फाॅर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अफसर खान यांनी यामागे कुठलाही राजकीय स्टंट नसल्याचा खुलासा केला आहे. एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघात तर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीतून पाठिंबा जाहीर केला होता. या दोन्ही मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया पार पडली.

वंचित बहुजन आघाडीने (VBA) या पाठिंब्याची परतफेड म्हणून संभाजीनगरार उमेदवार दिला नाही, अशी चर्चा काल दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती. परंतु अर्जांची छाननी झाल्यानंतर वंचितने अफसर खान (Afsar Khan) यांना एबी फाॅर्म दिल्याचे स्पष्ट झाले. अकोला मतदारसंघातील मुस्लिम मतांवर परिणाम होऊ नये, यासाठी याबाबत गुप्तता पाळण्यात आल्याचे बोलले गेले. एमआयएमने (MIM) वंचितवर दगाबाजी केल्याचा आरोपही केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी आज पत्रकार परिषदेत सर्व गोष्टींचा खुलासा केला. अकोला मतदारसंघात स्वतः प्रकाश आंबेडकर उमेदवार असल्याने ते व्यस्त होते. त्यामुळे एबी फॉर्म उशीरा मिळाला. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अपक्ष आणि वंचितकडून असे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 रोजी मला एबी फाॅर्म मिळाला आणि मग मी तो अर्जासोबत जोडला, असे स्पष्टीकरण अफसर खान यांनी दिले.

मी वंचित आघाडीचा अधिकृत उमेदवार असून लवकरच प्रकाश आंबेडकर माझ्या प्रचारासाठी शहरात सभा घेणार आहेत. त्यामुळे एबी फॉर्मवरून विरोधकांकडून ही राजकीय खेळी असल्याचा होणार आरोप चुकीचा असल्याचे खान म्हणाले. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मी शहर आणि जिल्ह्याचा दौरा करत आहे, यातून एमआयएम व इम्तियाज जलील यांच्यावर मुस्लीम समाज नाराज असल्याचे स्पष्ट होते.

त्यामुळे माझी लढत एमआयएम किंवा महाविकास आघाडीशी नाही, तर महायुतीच्या संदीपान भुमरे यांच्यासोबत असल्याचे अफसर खान यांनी सांगितले. गत पाच वर्षात इम्तियाज यांनी तर मागील वीस वर्षात चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याचा काहीच विकास केला नाही. मी कुणालाही पाठिंबा देण्यासाठी किंवा पाडण्यासाठी उभा नाही, तर जिंकण्यासाठी लढतो आहे.

इम्तियाज जलील यांनी केला अपेक्षा भंग

एमआयएम हा पक्ष मुस्लिम समाजाला भडकावण्याचे काम करतो आहे, पण आता समाज अशा गोष्टींना थारा देणार नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका वंचितची आहे. आमदार व खासदार झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी लोकांच्या अपेक्षाचा भंग केला आहे. अनेक मुस्लिम तरुण जेलमध्ये गेले, पण त्यांना सोडवण्याचे प्रयत्न या खासदारांनी कधी केले नाही. त्या मुलासांठी आम्ही धावून गेलो. किराडपुरा भागात दंगल झाली तेव्हा मी मंदिर वाचवायला गेलो, असे सांगणारे इम्तियाज जलील तिथे लपून बसले होते, अशी टीका अफसर खान यांनी यावेळी केली

(Edited By : Sachin Waghmare )

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com