Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प सर्वच घटकांना न्याय देणार आहे. विशेषतः मराठवाडा आणि संभाजीनगरच्या विकासासाठी अर्थसंकल्पामध्ये (Maharashtra Budget) भरीव तरतूद करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वॉटर ग्रीड,नाथ जलाशयातील फ्लोटिंग सोलार,छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळासाठी विस्तारीकरणासाठी भरघोस ७३४ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे, याबद्दल समाधान व्यक्त करतांनाच आजचा अर्थसंकल्प हा मराठवाड्याच्या विकासाला बुस्टर देणारा ठरेल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी व्यक्त केली आहे.
डाॅ. कराड (Dr.Bhagwat Karad) म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठविला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून वाटर ग्रीड द्वारे पाणी मिळणार आहे. (Marathwada) बीड, लातूर जिल्ह्यासाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्व मनार, धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना ,कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून पाणी वाटर ग्रीडला उपलब्ध होणार आहे.
छत्रपती संभाजी नगरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात, मी सातत्याने आग्रही मागणी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४८ एकर जमिन भूसंपादन करून किमान ८०० कोटी रुपये विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली होती.
अर्थसंकल्पामध्ये संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारीकरणाच्या भूसंपादनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून ७३४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे विस्तारीकरण आणि धावपट्टीचा प्रश्न मार्गी लागला आहे. जायकवाडी नाथ सागर जलाशयात तरंगत्या सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून जलाशयावरती तरंगते सौर ऊर्जा टाकण्यासंदर्भात मी सातत्याने केंद्र सरकार नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन आणि गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता. त्यामुळे आजची घोषणा निश्चितचपणे सौर ऊर्जेमध्ये क्रांतिकारी पाऊल राहणार आहे.
सिंचन आणि पाण्याच्या बाबतीमध्ये गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नगर,जळगाव जिल्ह्याला लाभ होईल. वैनगंगा खोऱ्यातून वाहून जाणारे पाणी वैनगंगा ,नळगंगा ,पैनगंगा नदीजोड प्रकल्पामधून नागपूर वर्धा अमरावती वाशिम जिल्ह्यांना मिळणार असल्याचे कराड म्हणाले. या शिवाय कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामुळे धाराशिव बीड जिल्ह्यातील १३३ गावांना लाभ होणार असून ११ हजार ६२६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता यासाठी देण्यात आली आहे. ही मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणावी लागेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असल्या कारणाने संभाजीनगर, नाशिक ,अमरावती, मुंबई ,नागपूर येथे शिवचरित्र वरील उद्यानासाठी २५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त देखील पुरेसा निधी देण्याचे सरकारने मान्य केले आहे ही आनंदाची बाब असल्याचे कराड यांनी सांगितले. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर तलावाच्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील नवीन क्रीडा विद्यापीठासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अनेक दिवसापासून क्रीडा विद्यापीठाच्या निधीची मागणी पूर्ण होत आहे. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील असल्याने शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये ३३३९ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बारा हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार असल्याने राज्याने प्रत्येक शेतकऱ्यासाठी सहा हजारांचा वाटा उचलला हे मोठे पाऊल म्हणावे लागेल.
हवामान बदलाच्या कचाट्यात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी बाब म्हणजे केवळ एक रुपयात पिक विमा आता यापुढे काढता येणार आहे. यापूर्वी योजनेमध्ये विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून भरली जात होती. आता शेतकऱ्यावर कोणताच भार राहणार नाही. सरकारच सर्व हप्ते भरणार आहे, शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पिक विमा काढता येणे शक्य होणार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असेल असेही कराड यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.