Ramtek News : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील शिवसेना शिंदे गटातील तीन खासदारांची उमेदवारी कापली असल्याने काहीशी नाराजी आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षाचे संबंध गेल्या काही दिवसापासून लोकसभेच्या जागावाटपावरून चांगलेच ताणले गेले आहेत. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मागितलेल्या जागा मिळत नसल्याने नाराजी समोर येत आहे.
शिवसेना शिंदे गटातील तीन खासदारांची उमेदवारी कापण्यात आल्याने शिंदे सेनेतील आमदारांची खदखद समोर आली आहे. त्याबाबत शनिवारी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) आमदारांनी या सर्व प्रकाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर उपस्थित मंत्री व आमदारांनी महायुतीमधील (Mahayuti) मित्रपक्षाच्या तक्रारीचा पाढाच वाचला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी प्रचारासाठी रामटेक येथे आले होते. रामटेक लोकसभेचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी लोकसभेची उमेदवारी कापलेल्या खासदार मंडळींचे लवकरच पुनर्वसन करणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शिंदे यांनी यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नकारल्यानंतर मी कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही, असे वक्तव्य केले. त्यानंतर आता रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना आपण खासदारकीपेक्षा मोठा सन्मान देऊ, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपल्या उमेदवारांसाठी मी लढत होतो हे कृपाल तुमाने यांनी स्वत:च सांगितले आहे. अखेरीस तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या म्हणून त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. मी घेतलेला निर्णय त्यांनी मान्य केला आणि राजू पारवेंसाठी ते कामही करीत आहेत. मात्र, मोठा भाऊ म्हणून मी शब्द देतो की तुमाने यांना खासदारकीपेक्षा मोठा सन्मान देईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.