Jalna News : शिवसेना, काँग्रेस आणि आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचा निर्णय गेत परतुरचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी पक्षाला झटका दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेथलिया यांनी परतूर मधून लढण्याची जोरदार तयारी केली होती. पक्षाकडूनही त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. परंतु ऐनवेळी महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला देण्यात आली. त्यानंतर जेथलिया यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांना यश आले नाही.
आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता सुरेश जेथलिया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात होणारा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. उद्या (ता.15) रोजी परतूरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जेथलिया यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यासाठी परतूरमध्ये जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जेथलिया राष्ट्रवादीत जाणार यांची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.
शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काही दिवसांपुर्वी जालना (Jalna) येथे आभार दौरा झाला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे व त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर काँग्रेसच्या आठ माजी नगरसेवकांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत धनुष्यबाण हाती घेतला होता. त्यानंतर काँग्रेसला जिल्ह्यात दुसरा धक्का सुरेश जेथलिया यांच्या रुपाने बसला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही दिवसापुर्वी जालना काँग्रेसमध्ये मोठा भूकंप घडणार असा दावा केला होता. त्या भूकंपाची ही सुरुवात तर नाही ना? अशी चर्चा यानिमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात होत आहे. जेथलिया यापूर्वी शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेवर निवडून गेले होते. 2009 मध्ये परतूर विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात सक्रीय होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून ते इच्छुक होते. त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जात होती. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षातील जागा ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जेथलिया यांनी अपक्ष निवडणूक लढविली, परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र तब्बल 54 हजार मतं घेत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रे दरम्यान, सुरेश जेथलिया शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशीही चर्चा होती, मात्र तसे काही घडले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासाठी जेथलिया यांच्या मुंबईत भेटीगाठी सुरू होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील जिल्ह्यात पुन्हा जम बसवण्यासाठी एका मोठ्या नेत्याची गरज होती. सुरेश जेथलिया यांच्या पक्ष प्रवेशाने ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शनात जेथलिया याचा राष्ट्रवादीतील प्रवेश होणार आहे. जेथलिया हे स्थानिक नगर परिषदेच्या राजकारणात पुढे आलेले राजकीय नेतृत्व आहे.
परतूर नगर परिषद जवळपास तीन दशके त्यांच्या अधिपत्याखाली राहिलेली आहे. ते स्वत: परतूरचे नगराध्यक्ष राहिलेले असून, त्यांच्या पत्नी विमल जेथलिया याही नगराध्यक्षपदी राहिलेल्या आहेत. तालुक्याच्या राजकारणावर जेथलिया यांची मजबूत पकड असल्याने याचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.