गेवराई नगरपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि लक्ष्मण पवार यांनी ताकद लावली आहे.
या दोघांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा करत राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ घडवली.
या घोषणेमुळे गेवराईतील राजकीय वातावरण तापले असून प्रतिस्पर्धी गटांत हालचाल सुरू झाली आहे.
दत्ता देशमुख
Local Body Election 2026 : राज्यातील वरिष्ठ नेते ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणत, आम्ही तुमच्यासाठी राबू, अशी ग्वाही देत आहेत. तर इकडे स्थानिक पातळीवर मात्र लेक-सून आणि नातेवाईकांनाच मैदानात उतरवण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सुरू आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईत नगराध्यक्षपदाचाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून जाहीर झाले आहेत. गेवराईत'लेक-सून' तर भाजपकडूनही स्थानिक नेत्याने सूनेला मैदानात उतरवले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही घराणेशाही आणि नात्यागोत्यालाच प्राधान्य दिले जात असल्याने कार्यकर्त्यांवर पुन्हा सतरंज्याच उचलण्याची वेळ येणार, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. चार वर्षांपूर्वी मुदत संपूनही विविध कारणांनी लांबलेल्या नगर पालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. मात्र, इच्छुकांकडून उमेदवारी मागणी, मुलाखती, चाचपणी अशा प्रक्रीया सुरु असताना गेवराईत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे.
जिल्ह्यातला एव्हाना विभागातील ही पहिलीच अधिकृत उमेदवारी मानली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी गुरुवारी (ता. सहा) रात्री एका मेळाव्यात शितल महेश दाभाडे यांची उमेदवारी जाहीर केली. शितल दाभाडे यांचे माहेर देखील गेवराईतील असल्यामुळे 'गेवराईची सुन, गेवराईची लेक'अशी टॅगलाईन राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. भाजप देखील या ठिकाणी तेवढ्याच तोडीचा उमेदवार रिंगणात उतरविणार असून गिता बाळराजे पवार या भाजपच्या उमेदवार असतील असे मानले जाते.
गेवराईच्या राजकारणात सुरुवातीला पंडित विरुद्ध पवार व पुढे पंडित विरुद्ध पंडित असे सामने रंगले. त्या काळी पवारांकडे नगर पालिका आणि पंडितांकडे विधानसभा असे अलिखीत सुत्र तयार झाले. सुरुवातीला राजकीय विरोधक पवार 'नातेगोत्यामुळे'एकत्र आले. पण, पुन्हा लक्ष्मण पवारांनीही पंडितांना आव्हान देत बदामराव आणि विजयसिंहांचा पराभव केला. त्यांची राजकीय सुरुवात नगराध्यक्ष म्हणूनच झाली.
दरम्यान, गेवराईतील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर वर्चस्व आणि शिक्षण संस्थांचे जाळे असणाऱ्या पंडितांना अलिकडच्या काही निवडणुकांत गेवराई नगर पालिका एकहाती ताब्यात घेता आलेली नाही. मात्र, विधानसभेला विजयसिंह पंडित यांच्या विजयानंतर पंडितांची गाडी देखील सुसाट आहे. शहरातील विकास कामे, अतिक्रमणग्रस्तांना मालकी हक्काच्या पीटीआरच्या माध्यमातून त्यांनी नगर पालिकेची पायाभरणी केली आहे. सध्या त्यांच्याकडे इनकमिंग सुरु आहे.
यातच त्यांनी आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करुन बाजी मारली आहे. विधानसभेत पराभवानंतर प्रकृतीच्या कारणाने लक्ष्मण पवार राजकीय पटलापासून दुर असून बंधू बाळराजे भाजपकडून सक्रीय आहेत. त्यांच्या जोडीला पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री बदामराव पंडित यांनाही भाजपमध्ये घेतले. गेवराई नगर पालिकेवर तीन टर्म पवारांची सत्ता असल्याने त्यांना शहराची नस माहिती आहे. गिता पवार यांचा शहरातील राजकारण, समाजकारणात चांगला वावर असल्याने भाजपकडून त्यांचे नाव पुढे येणार असे मानले जाते. आता पवार पुन्हा वर्चस्व राखणार का पंडित नगर पालिकेवर झेंडा फडकविणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
1. गेवराई नगरपरिषद निवडणुका कधी होणार आहेत?
➡️ निवडणुका जाहीर झाली असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
2. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी कोणाचा उमेदवार जाहीर केला?
➡️ त्यांनी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.
3. लक्ष्मण पवार कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत?
➡️ लक्ष्मण पवार हे स्थानिक पातळीवर प्रभावशाली नेते असून पंडित विरोधक आहेत.
4. या घोषणेमुळे गेवराईत कोणते राजकीय बदल दिसत आहेत?
➡️ विरोधकांमध्ये चिंता वाढली असून आघाडी-मैत्रीचे समीकरण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.
5. स्थानिक जनतेची या निर्णयावर प्रतिक्रिया काय आहे?
➡️ स्थानिक मतदारांमध्ये उत्सुकता आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.