औरंगाबाद : राज्याचे रोहयो मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदरासंघाकडे जाणारा औरंगाबाद- पैठण या रस्त्याचे टेंडर सध्या वादात सापडले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Paithan) यांच्या भावाने चक्क ४१ टक्के कमी दराने हे टेंडर घेतले आणि पाचशे कोटींचे काम हा कंत्राटदार अडीचशे कोटीत कसे करणार? ते किती दर्जाचे असेल याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी एका दैनिकाच्या बातमीचा हवाला देत ट्विट करत भाष्य केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना या संदर्भात उत्तर मागितले आहे. औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन दशकांपासून रखडले आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या मार्गावरील खडतर प्रवास करत अनेक भाविक वर्षोनुवर्ष पैठणला दर्शनाला जात आहेत.
या रस्त्याच्या कामाच्या अनेकदा निविदा निघाल्या पण प्रत्यक्षात काम मात्र सुरू होऊ शकले नव्हते. आता ४२ किलोमीटरच्या या रस्त्याची निविदा अंतिम करण्यात आली असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावालाच कंत्राट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ४९५ कोटींचे हे काम सदरील ठेकेदार ४१ टक्के इतक्या कमी दरात करण्यास तयार झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमकं यावर बोट ठेवत खासदार इम्तियाज जलील यांनी नितीन गडकरी, संबंधित ठेकेदार व त्यांच्या मंत्री असलेल्या नातेवाईकांना उद्देशून काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. इम्तियाज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ६% रॉयल्टी, १% श्रम उपकर, १% जोखीम धोरण, ३% गळती, ०.३% अतिरिक्त बँक हमी शुल्क जोडल्यास या सगळ्यावर ५०% पेक्षा जास्त खर्च करणारा ठेकेदार ५०० कोटी रुपयांची कामे फक्त२५० कोटीत कशी करणार आहे?
अंदाजात फेरफार करण्यात आला का? की तो सब स्टँडर्ड काम करणार आहे? औरंगाबाद - पैठण रस्त्याचे ४९५ कोटी रुपयांचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे, जो योगायोगाने भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या जवळचा नातेवाईक आहे! त्याने ४१% पेक्षा कमी दराने निविदा मिळविली? आता कृपया उत्तर द्या मंत्री महोदय, असे म्हणत त्यांनी या संपुर्ण प्रक्रियेबद्दल शंका उपस्थितीत केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.