नांदेड ः देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने भाजपला अखेर शाॅक दिलाच. कुठलीही पोटनिवडणूक झाली की आता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा वल्गना भाजपकडून सातत्याने केल्या गेल्या. पंढरपूर पोटनिवडणूकीच्या प्रचार सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रमाचा इशारा दिला होता. त्यानंतर भाजपमध्ये असे इशारे आणि त्याचे मुहूर्त ठरवण्याची जणू स्पर्धाच लागली होती.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांपासून अनेक नेते पदाधिकाऱ्यांना देखील याचा मोह आवरता आला नाही. पण त्या करेक्ट कार्यक्रमाचा मुहूर्त काही अजून भाजपच्या नेत्यांना सापडलेला नाही. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देगलूर-बिलोलीच्या प्रचारसभे निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत या निवडणूकीच्या निकालानंतर फडणवीस महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील, असे सांगितले होते.
आता काल पोटनिवडणुकीचा निकाल लागून त्यात भाजपचा `निक्काल`, लागला. काॅंग्रेसचे जितेश अंतापूरकर हे आपले वडिल स्व. रावसाहेब अंतापूरकर यांच्यापेक्षा दुप्पट मताधिक्य घेऊन विजयी झाले. भाजपचे उमेदवार साबणे यांना जेमतेम गेल्या निवडणुकीत मिळालेली मत संख्या गाठता आली. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न फसले तेव्हाच पालकमंत्री अशोक चव्हाण सावध झाले होते.
भाजपने निवडणूक लादली असे म्हणत त्यांनी रणनिती आखायला सुरूवात केली. कुठलीही जोखीम किंवा फक्त सहानुभूतीच्या लाटेच्या भरवशावर न राहता आपण जिल्ह्यात व मतदारसंघात केलेली विकासकामे प्रामुख्याने त्यांनी लोकांसमोर ठेवली. मतांचे विभाजन टाळण्याचे आवानह केले. पण त्याही आधी भावजी भास्कर खतगांवकर यांना पुन्हा काॅंग्रेसमध्ये आणण्यात यश मिळवले आणि अर्धी लढाई जिंकली.
खतगांवकर यांनी ऐन निवडणुकीत भाजपला रामराम केल्याचा धक्का चंद्रकांत पाटलांनाही बसला आणि आता हा पेपर अवघड झाल्याची कबुलीही दिली. त्यामुळे काॅंग्रेसचे काम पुढे सोपे होत गेले. वंचितच्या उमेदवाराकडे मतं जाऊ नये यासाठी लावलेली फिल्डींग देखील कमालीची यशस्वी ठरली.
भाजपच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या, अशोक चव्हाणांना लक्ष केले, जातीचे समीकरण साधण्यासाठी कर्नाटकातील लिंगायत समाजाचे असलेले केंद्रीय मंत्री खुबा, धनगर समाजाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही मैदानात उतरवले. पण अशोक चव्हाण यांनी एकहाती प्रचाराची धुरा सांभाळत भाजपला नामोहरम केलेच. त्यामुळे दर निवडणुकीच्या निकालानंतर आता करेक्ट कार्यक्रम करणारच म्हणणाऱ्या भाजपचाच अशोक चव्हाणांनी करेक्ट कार्यक्रम केला असेच म्हणावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.