Latur Congress-BJP Political News : विधानसभा निवडणुक दोन महिन्यावर आली असताना लातूर जिल्ह्यातील सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महायुती-महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षांनी जोर लावत काही उमेदवारही घोषित केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात लातूर ग्रामीणसाठी उमेदवार जाहीर केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी काँग्रेसच्या डाॅ. शिवाजी काळगे यांनी दणदणीत विजय मिळवत जिल्ह्यात पुनरागमन केले.
भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचा 61 हजारांच्या मताधिक्याने पराभव करत लातूर जिल्ह्यात काँग्रेसने पुन्हा एकदा मुसंडी मारली. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्ह्यावरील वर्चस्व गमावलेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सूर गवसला. माजीमंत्री व लातूरचे विद्यमान आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या नेतृत्वात लोकसभेला मिळालेला विजय काँग्रेस पक्षासाठी टाॅनिक ठरला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची चलती दिसते आहे, तर महायुतीतील भाजपची वाटचाल काहीशी खडतर असणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. मध्यंतरी भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे या नेत्यांनी निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघातील पदयात्रेत सहभागी होत त्यांना बळ देण्याचे प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. पण ते करत असताना आधी त्यांना आपलाच मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी झगडावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांना निलंग्यातून लीड मिळाल्यापासून संभाजी पाटील निलंगेकर (Sambhajipatil Nilangekar) अधिक सावध झाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा पैकी फक्त निलंगा विधानसभा मतदारसंघ भाजपला जिंकता आला होता. तर लातूर शहर, ग्रामीण काँग्रसेच्या अमित आणि धीरज देशमुख बंधुंनी राखला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदपूर बाबासाहेब पाटील, उदगीर संजय बनसोडे हे दोघे विजयी झाले आहेत.
तर नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघ जो लोकसभेला लातूरमध्ये येतो इथे शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे विजयी झाले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संजय बनसोडे हे अजित पवारांसोबत गेले आहेत, जो पक्ष सध्या महायुतीचा भाग आहे. तर बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत म्हणजेच महाविकास आघाडीत आहेत. निलंगा मतदारसंघाची एकमेव जागा भाजपकडे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रुपाने आहे.
लातूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची फारशी ताकद नाही. अशावेळी भाजप एखादी अतिरिक्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात सध्या दोन आमदार आहेत, पैकी एक अजित पवार गटात तर दुसरा शरद पवारांच्या पक्षात. अशावेळी अजित पवार सहापैकी तीन मतदारसंघावर दावा करू शकतात.
काँग्रेस घेणार सर्वाधिक जागा..
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळवल्यानंतर जिल्ह्यात अमित देशमुख यांचे वजन वाढले आहे. केवळ जिल्ह्यातच नाही तर त्यांच्याकडे मराठवाड्यातील काँग्रसचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. अशावेळी जिल्ह्यातील सहा पैकी किमान चार जागा मिळाव्यात असे, प्रयत्न काँग्रेसकडून केले जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुर्वीच्या उदगीर आणि अहमदपूर या दोन मतदारसंघावर दावा सांगितला जाईल. अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीतील जागा वाटपाला वेग आला आहे. अनेक मतदारसंघावर नेत्यांचे एकमत झाल्याची चर्चा आहे. लातूर जिल्ह्याचा विचार केला तर अमित देशमुख यांचा शब्द अंतिम असणार आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता आहे. तर संघटनात्मक दृष्ट्या फारशी ताकद नसलेल्या ठाकरे गटाला एखादी जागा तरी मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. महायुतीत अशीच परिस्थिती शिवसेना शिंदे गटाची असणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस तर महायुतीत भाजप हे दोन पक्षच सहापैकी चार विधानसभेच्या जागा लढवण्याची शक्यता अधिक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.