Jalna Election 2024 Result Updates: रावसाहेब दानवे यांच्या लोकसभेच्या जालना मतदारसंघातील पराभवाची अनेक कारणे समोर येत आहेत. मराठा फॅक्टर, भाजपमधील अंतर्गत नाराजी, मित्र पक्षांनी केलेला दगाफटका, एकाधिकारशाही विरोधातील संताप या सगळ्याचा परिणाम दानवे यांच्या पराभवात झाला. जालना लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजप आणि मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतांना दानवे यांना चकवा बसला.
मतदारसंघातील दोन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar)आणि संदीपान भुमरे यांच्या सिल्लोड-पैठण विधानसभा मतदारसंघातून दानवे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळणे अपेक्षित होते.
मात्र या दोन्ही मतदारसंघात त्यांच्या करेक्ट कार्यक्रम झाला. इथे काँग्रेस महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना मताधिक्य मिळाले. मतदान पार पाडल्यापासून भुमरे-सत्तार यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता.
निवडणूक निकाल आणि त्यानंतर मतदारसंघनिहाय आकडेवारी समोर आल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे पैठण आणि सिल्लोड हे दोन्ही मतदारसंघ असे आहेत जिथे भुमरे-सत्तार यांचाच शब्द अंतिम मानला जातो. मग असे असताना या दोन्ही मतदारसंघांनी रावसाहेब दानवे यांना हात देत त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पैठण विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे 27 हजार 856 मतांनी मागे आहेत. या मतदरसंघात काँग्रेसचे कल्याण काळे यांना 95 हजार 19 मते मिळाली. तर रावसाहेब दानवे यांना 67 हजार 126. तसे पाहिले तर ही महायुतीच्या पैठणमधील विधानसभेच्या संभाव्य उमेदवारासाठी देखील धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
संदीपान भुमरे हे लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभेत त्यांचे पुत्र विलास भुमरे पैठणमधून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुतीला लोकसभेत झालेली घसरण थांबवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. संदीपान भुमरे स्वतः संभाजीनगरमधून लोकसभेचे उमेदवार असल्याने त्यांची पैठणमधील संपूर्ण यंत्रणा तिकडे राबत होती.
रावसाहेब दानवे यांना याचाही फटका बसल्याचे दिसून आले. तिकडे गेल्या पंधरा-वीस वर्षापासून सिल्लोड-सोयगावचे आमदार तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास व पणनमंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्या पडद्यामागील मैत्रीतही यावेळी दरार आली. परिणामी येणाऱ्या विधानसभेत आपला बिसमिल्ला होण्याआधी सत्तार यांनी दानवेंचा गेम केल्याची चर्चा आहे.
दानवे यांच्या खासदारकीच्या पाच टर्ममध्ये सिल्लोड-सोयगांवमधून सातत्याने त्यांना मताधिक्य मिळत होते. यावेळी मात्र सत्तार यांनी वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसून आले. दानवे या मतदारसंघातून 27 हजार 759 मतांनी मागे आहेत. या मतदरसंघात काँग्रेसचे कल्याण काळे यांना 1 लाख 1 हजार 37 मते मिळाली तर रावसाहेब दानवे यांना 73 हजार 278 मतांवर समाधान मानावे लागले.
लोकसभेला जरी या मतदारसंघा काळेंना मताधिक्य मिळाले असले तरी तो सत्तार यांचा गेम प्लान असल्याचे बोलले जाते. विधानसभेला याचा सत्तार यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही, ते होऊ देणार नाही, अशीही चर्चा आहे. एकूणच रावसाहेब दानवे यांना मंत्री भुमरे-सत्तार जोडीने चांगलाच हात दिल्याचे दिसते.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.