

Latur Politics : राम काळगे
रेल्वेचा एखादा प्रकल्प आपल्याच मतदारसंघातून जावा, असा आग्रह आणि इच्छा त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची असते. यासंदर्भात दावे-प्रतिदावे करून हे नेते निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु कुठलाही रेल्वे मार्ग किती खर्चिक आहे आणि त्यातून रेल्वेला अपेक्षित उत्पन्न मिळणार आहे की नाही, याची व्यवहार्यता तपासूनच त्याला मंजुरी दिली जाते.
याच निकषानुसार कलबुर्गी ते लातूर या नव्या रेल्वे मार्गासाठी उमरगा-औसा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे निलंगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग आपल्या मतदारसंघातून जावा, हे प्रयत्न फोल ठरले आहेत. रेल्वे विभागाने या मार्गासाठी औसा-उमरगा तालुक्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे निलंगेकरांचे रेल्वे आणण्याचे स्वप्न तूर्तास तरी भंगले आहे.
संभाजी पाटील निलंगेकर हे प्रस्तावित रेल्वे आपल्या मतदारसंघातून धावावी यासाठी प्रयत्नशील होते. हा मार्ग पूर्ण होणार नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, असा प्रण त्यांनी घेतला होता. हायवे आला, आता रेल्वे आणल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही, असा शब्द निलंगेकरांनी मतदारांना दिला होता.
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांत रेल्वेच्याच मुद्द्यावर मतदारांनी त्यांना कौल दिला होता, असेही बोलले जाते. प्रत्यक्षात समोर आलेल्या रेल्वेच्या अधिकृत आराखड्यातून निलंगा मतदारसंघ पूर्णपणे वगळला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. कलबुर्गी ते लातूर दरम्यानच्या 157.82 किलोमीटरच्या नवीन ब्रॉडगेज, विद्युत कृत रेल्वेमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) भारतीय रेल्वेने तयार केला असून, हा मार्ग निलंग्याऐवजी उमरगा (जि. धाराशिव) आणि औसा (जि. लातूर) या जवळच्या तालुक्यांमधून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे दहा वर्षांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या निलंगेकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग संभाजी पाटील निलंगेकर यांचे राजकीय विरोधक असलेल्या औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या औसा मतदारसंघातून जाणार आहे. त्यामुळे याकडे कुरघोडीच्या राजकारणाच्या नजरेतूनदेखील पाहिले जात आहे.
रेल्वेच्या मुंबईतील मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) भुवनेश कुमार गुप्ता यांच्या पत्रानुसार, या 157.82 कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची अंदाजित किंमत 4,917 कोटी रुपये इतकी आहे. सद्यस्थितीत कलबुर्गी ते लातूर हे अंतर रेल्वेने तब्बल 345 कि.मी.चे आहे. या नवीन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातून 96.82 कि.मी.चा मार्ग जाणार असून, हे अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
या प्रकल्पामुळे व्यापार, उद्योग, विद्यार्थी आणि भाविकांना मोठा फायदा होणार असला, तरी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या या प्रकल्पाचा आर्थिक परतावा (IRR) 10 टक्के मिळत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे भारतीय रेल्वेने महाराष्ट्र शासनाकडे 50 टक्के खर्चाचा हिस्सा आणि मोफत जमिनीची मागणी केली आहे. राज्य सरकारने ही अट मान्य केल्यानंतरच या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी निलंग्यात रेल्वे आणण्याचे आश्वासन देऊन राजकारण तापवले. मात्र, प्रत्यक्ष सर्वेक्षणात तांत्रिक आणि भौगोलिकदृष्ट्या उमरगा-औसा मार्ग सोयीचा ठरल्याने निलंग्याचा मार्ग आपोआप बंद झाला आहे. त्यामुळे 'रेल्वे धावणार' या केवळ घोषणा ठरल्या असून, लोकप्रतिनिधींचे दावे फोल ठरले आहेत. आता रेल्वे तर निलंग्यात येत नाही, पण ज्या 'सत्कार न स्वीकारण्याच्या' शपथा आमदारांनी घेतल्या होत्या, त्याचे काय? असा सवाल केला जात आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर (माणिकदंड), शिरूर अनंतपाळ, देवणी, निलंगा मार्गे कलबुर्गी असा रेल्वे मार्ग जाणार होता. परंतु तो आता रेल्वेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणात बदलण्यात आल्याचे पत्र रेल्वे अधिकाऱ्यांनी काढल्याने निलंगा मतदारसंघातील जनतेची घोर निराशा झाली आहे.
निलंगा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून रेल्वे ही निलंगा मतदारसंघातूनच जाणार, अशी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे. तर औसा मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून रेल्वे निलंगा वगळून औसा मतदारसंघातून जाणार असल्याचे रेल्वेचे अधिकृत पत्र फिरवले जात आहे. त्यामुळे रेल्वे नेमकी कोणत्या मार्गावरून धावणार, याबाबत मतदारसंघातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मागील काळात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका जाहीर कार्यक्रमात रेल्वे ही औसा मतदारसंघातूनच जाणार, अशी हमी दिली होती. तसेच 16 एप्रिल 2026 रोजीचे रेल्वे विभागाचे अधिकृत पत्र सोशल मीडियावर फिरत असल्याने रेल्वे मार्ग औसा मतदारसंघातूनच जाणार, असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.