

Latur Politics : लातूर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकादा भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख आमने-सामने आले आहेत. दिवंगत विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा सांगणारे, त्यांना अभिप्रेत असलेले काम करत आहेत का? असा सवाल करत निलंगेकरांनी अमित देशमुख यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'निलंगेकर-देशमुख ही लढाई बाभळगावपासून निलंग्यापर्यंत चालेल, पण लातूर शहर हे विकासाच्या मुद्द्यावरच ठाम राहील, असेही निलंगेकरांनी स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची सरशी झाली. निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत अमित देशमुख विरुद्ध संभाजी पाटील असा सामना रंगला होता. तो संभाजी पाटील यांनी जिंकला, पण काँग्रेसने तिथे भाजपला चांगली टक्कर दिली होती. आता लातूर महापालिकेत पुन्हा एकदा अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे.
दोन्ही नेत्यांकडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे. लातूर महापालिकेची ही तिसरी निवडणूक आहे. दोनवेळा इथे काँग्रेसची सत्ता होती. तर गेल्या निवडणुकीत भाजपने ही महापालिका ताब्यात घेत अडीच वर्ष सत्ता उपभोगली होती. त्यानंतर पुन्हा काँग्रेसने भाजपचे दोन नगरसेवक गळाला लावले आणि सत्ता खेचून आणली. महापालिकेत झिरो टू हिरो ठरलेल्या भाजपचे श्रेय संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यावेळी दिले गेले होते. पक्षाने आता पुन्हा त्यांच्यावर निवडणुक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
लातूर महापालिका निवडणुकीचा प्रचार हा विकासकामांवर होतो की मग पुन्हा देशमुख विरुद्ध निलंगेकर? यांच्यातील कुरघोडीचे राजकारण या भोवतीच प्रचारात धुराळा उडवला जातो हे पहावे लागणार आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुख यांच्यावर राजकीय वारसावरून निशाणा साधत त्यांचे लक्ष्य स्पष्ट केले आहे. विकास हाच भाजपचा अजेंडा असल्याचे सांगताना काँग्रेसवर मात्र निलंगेकरांनी जातीय विष पेरण्याचा आरोप केला आहे.
भारतीय जनता पक्ष लातूर महानगरपालिका निवडणुकीत पूर्णपणे 'विकासाची' भूमिका घेऊन जनतेच्या दरबारात जात आहे. मात्र, आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने काँग्रेसकडून शहरात जातीय द्वेष पसरवून निवडणूक वेगळ्या दिशेला भरकटवण्याचे काम केले जात असल्याचे निलंगेकर यांनी म्हटले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. लातूर महापालिकेतही भाजपला संधी मिळाल्यास विकासाचे 'ट्रिपल इंजिन' धावेल आणि शहराचा कायापालट होईल, असा दावा त्यांनी केला.
जनतेने 15 वर्षे तुम्हाला साथ दिली, साहेबांचा वारसा तुमच्याकडे सोपवला, पण खरोखर साहेबांना अभिप्रेत असलेले काम तुम्ही केले का? असा सवाल अमित देशमुख यांचे नाव न घेता त्यांनी केला. वाहतूक कोंडी आणि 'स्थानिक'नेता लातूरच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन हवे. पण त्यासाठी नेत्याने लातूरमध्ये राहणे आवश्यक आहे, असा टोलाही निलंगेकरांनी लगावला. सोशल मीडियावरून शहराचे सुसंस्कृत वातावरण बिघडवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.