Latur News : लातूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मान्यता दिली. त्यानंतर महापालिकेच्या वतीने ही प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. 2017 च्याच प्रभागरचनेचा पॅटर्न यापुढेही कायम असणार आहे. 18 प्रभाग आणि 70 नगरसेवक असा हा पॅटर्न असल्याने येथे प्रभाग किंवा नगरसेवकांच्या संख्येत वाढ झालेली नाही.
महापालिकेच्या (Municipal Corporation) आयुक्त मानसी व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसापासून प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरु होते. काही दिवसापूर्वीच ही प्रभागरचना महापालिकेच्या वतीने निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली होती. शासनाने 14 ऑगस्ट रोजी प्रभागरचनेसंदर्भात कार्यक्रम जाहिर केला होता. त्यानुसार 3 सप्टेंबर रोजी प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार होती.
महापालिकेच्या वतीने याची तयारीही करण्यात आली होती. (Latur) पण राज्य निवडणूकआयोगाकडून दिवसभरात प्रारुप प्रभाग रचना करण्यासंदर्भात आदेश आलेले नव्हते. सायंकाळी हे आदेश आल्याने महापालिकेने ही प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध केली. 2017 च्या निवडणुकीतील प्रभाग रचनेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अठरा प्रभाग व 70 नगरसेवकच राहणार आहेत. प्रभाग किंवा नगरसेवकात वाढ झालेली नाही.
15 पर्यंत हरकतीसाठी मुदत..
प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार यावर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहेत. 16 ते 22 सप्टेंबर या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून हरकतीवर सुनावणी घेतली जाणार आहे. तर 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत सुनावणीनंतर हकरती व सूचनावरील शिफारशी विचारात घेवून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी दिली.
गेल्या महापालिकेतील चित्र..
2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत 70 पैकी 36 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. काँग्रेसची सत्ता गेली तरी त्यांनी 33 नगरसेवक निवडून आणत भाजपाला जोरदार टक्कर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आल्याने त्यांचे खाते उघडले होते. भाजपाने बहुमतासह मिळवलेली सत्ता अडीच वर्षानंतर काँग्रेसने दोन नगरसेवक फोडून उलथवून टाकली होती. भाजपाच्या शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव करत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.