Abdul Sattar News : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अधिवेशनादरम्यान गायरान जमिनी आणि कृषी प्रदर्शनासाठी बेकायदा निधी जमवल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे अधिवेशन चांगलंच गाजलं. असे असतानाच आता अब्दुल सत्तारांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
''माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार हे एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, ''माझ्यावर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केले आहेत. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पण विरोधकांनी माझ्यावर आरोप केले. मात्र त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळलं आहे. त्यांच्या चौकशा झाल्या तर पळता भुई थोडी होईल'', असं म्हणत त्यांनी विरोधकांना एक प्रकारे इशाराच दिला.
टीईटी घोटाळा, गायरान जमिनी आणि सिल्लोडमधील कृषी प्रदर्शनासाठी बेकायदा निधी जमवल्याचा आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आले. यावर बोलताना ते म्हणाले, ''हे सर्व मला बदनाम करण्याच्या पार्श्वभूमीवर केले जाते. मग यामध्ये काही माझ्या पक्षातील देखील असू शकतात. तसेच यामध्ये काही माझे हितचिंतकही आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरू आहे'', असा आरोप त्यांनी यावेळी केला.
''माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजातील सर्व साधारण माणसाला एवढं महत्वाचं खातं दिलं. त्यामुळे या वरून काही लोकांच्या मनात खदखद आहे. टीईटी घोटाळा प्रकरणामध्ये मी पंचवीस पैशाचाही फायदा घेतलेला नाही. आम्ही यामध्ये कोणताही घोटाळा केलेला नाही असा रिपोर्ट देखील आयुक्तांनी दिलेला आहे. मग यापेक्षा आणखीन काय प्रुफ पाहिजे. यावर उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे'', असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
''मात्र यामागे माझ्या पक्षातील लोक असतील, माझे हितचिंतक असतील किंवा विरोधीपक्षातील ज्यांच्या खुर्च्या खाली झाल्या, जे मलई खात होते ते ही असतील'', असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
''आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. याविषयीची चर्चा बाहेर कशी आली? आणि आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचं सांगितलं. मी कोणाचेही नाव घेत नाही. पण याबाबत मुख्यमंत्री सर्व गोष्टीचा तपास करणार आहेत, त्यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
दरम्यान, माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याच्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरू तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे यावर आता शिंदे गटातील नेते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.