Parbahni News : परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहाेचला आहे. महायुतीचे महादेव जानकरविरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात परभणीत काँटे की टक्कर होत आहे. दोघांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. महादेव जानकर यांना या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.
महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) निवडणूक विभागाकडे (Election Comission) सफरचंद, रोडरोलर व शिट्टी या तीन चिन्हांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर सोमवारी निवडणूक आयोगाने जानकर यांना शिट्टी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे आता परभणी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शिट्टी विरुद्ध मशाल अशी लढत होणार आहे. (Parbhani Lok Sabha Election 2024 News)
शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना परभणीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तर महायुतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मैदानात उतरवले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघातून कपबशी चिन्हावर निवडणूक लढले होते. त्यानंतर महादेव जानकर हे परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परभणीत जानकर हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आहेत.
परभणी लोकसभा निवडणुकीत रासपच्या महादेव जानकर विरोधात महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्यात लढत होत आहे. या ठिकाणी दोघेही प्रथमच दोघेही नवीन चिन्हावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे शिट्टी विरुद्ध मशालीच्या या लढाईत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परभणी लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाच्या हक्काची जागा आहे. महायुतीच्या ध्येय धोरणात सापडल्यामुळे तर वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ही जागा मिळाली नसल्यामुळे जानकरांच्या रासपसाठी सोडावी लागली. त्यामुळे परभणीत शिवसेना ठाकरे गटाला 35 वर्षांत पहिल्यांदा धनुष्यबाणाशिवाय निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ 25 वर्षांनंतर निवडणुकीतून गायब दिसणार आहे. २६ एप्रिलला पहिल्यांदाच धनुष्यबाण व घड्याळ चिन्ह मतदान यंत्रावर नसणार आहे. त्यामुळे मतदारांना त्यांचा उमेदवार व त्यांचे चिन्ह समजावून घेऊन मतदान करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
R