Parbhani Political News : महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. जानकारांच्या या तयारीमुळे महायुतीमधील नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. विशेषतः गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची घालमेल होताना दिसत आहे.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अन्य प्रादेशिक पक्ष सहभागी असलेल्या महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचाही समावेश आहे. महायुतीमधील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. परभणी लोकसभा मतदारसंघसाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बीड येथील ओबीसी मेळाव्यात परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोणासोबत न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाकडून परभणी लोकसभा मतदारसंघात बुथ स्तरावरील संघटन वाढवण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यात संपन्न झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेले नाहीत. तसेच पुढील आठवड्यात परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षातर्फे कार्यकर्ता मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
यासाठी पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर स्वतः उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या भूमिकेमुळे महायुतीमधील नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. कारण भाजपा पारंपारिक मतदार असलेल्या ओबीसी मतदारांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध जातींचा समावेश असलेल्या ओबीसी वर्गाला एकत्रित करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात आहे. यासाठी ओबीसी एल्गार महासभेचे आयोजनही होत आहे.
या मेळाव्यांमधून ओबीसी मतदारांची राजकीय अस्मिता जागृत करण्याचे प्रयत्न वक्तांकडून होत आहेत. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवारास बसू शकतो. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आहेत.
गुट्टे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हेच असतील, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. परंतु महादेव जानकर यांची वेगळी भूमिका आणि भाजपा नेत्यांशी असणारे घनिष्ठ संबंध यामुळे गुट्टे यांची घालमेल होताना दिसून येत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.