Beed News : आपल्याला लेकरांसाठी भोगावे लागेल, नाही तर उद्या त्यांचे अवघड होईल. एरव्ही गुन्हे दाखल होतातच ना. मग, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झाले तर होऊ द्या. आता लढाई जवळ आलीय. आता तर सत्ताधारी व विरोधक दोघे एकत्र आलेत. बारामतीत सर्व एकत्र होते. त्यामुळे समाजाने आपली ताकद कायम ठेवावी, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केले.
रविवारी बीड तालुक्यातील वानगाव फाटा येथे जरांगे यांची संवाद बैठक झाली. पोलिसांमार्फत आंदोलन दाबण्यासाठी कार्यकर्त्यांवर दबाव, गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक षडयंत्र केलेत, हे त्यांचेही शेवटचे अस्त्र असेल. पण, यातून समाजाने मुसांडी मारली तर आपले ध्येय साध्य होईल, असा विश्वासही जरांगे यांनी व्यक्त केला.
केस होऊन आतमध्ये राहिल्याने तरुणही निर्भिड झाले आहेत. सहा महिने झाले समाजाला वेड्यात काढले जाते आहे . मला काहीही नको, मान कापली तरी आपण हटणार नाही. खोटे अहवाल तयार करुन जेलमध्ये टाकून सडवले तरी समाजासोबत गद्दारी करणार नाही. १० टक्के आरक्षणाला मी हो म्हणावे म्हणून दबाव असून मी हो म्हणालो तर या दोघांत मला खुर्ची देतील. पण अशा खुर्चीला लाथ मारतो, असेही मनोज जरांगे म्हणाले.
अटक टाळण्यासाठी लोक आजारांचा बहाणा करतात. पण, माझ्याकडे एसआयटीचे लोक म्हणून कळल्याने आपणच उपचार सोडून अंतरावालीत आलो, असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माझ्या मागे शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असल्याचे फडणवीस (Devendra Fadnvis ) म्हणतात. पण, फडणवीस यांनी केलेला हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. माझा असला अवतार आहे. त्यामुळे ते माझ्याकडे कशाला येतील, असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.
(Edited By : Sachin Waghmare)