Dharashiv News : आम्ही निष्ठावंत आणि जातीवंत असल्याने तुरुंगातही जायला घाबरत नाही. समाजासाठी मी कुटुंब बाजूला सारलं, समाजासाठी मी माझा जीव पण द्यायला तयार आहे. पण मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतूनच मिळाले पाहिजे, तो आमचा अधिकार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील संवाद सभेत जरांगे पाटील यांनी सरकावर पुन्हा तोफ डागली.
शेतकरी, कष्टकरी, राजकारणी नोकरदार यांच्यासह सगळ्यांचं कल्याण होणार आहे. आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसीमधूनच आणि तो आपला अधिकार आहे. केंद्रीय महाविद्यालयात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश आणि केंद्राच्या नोकऱ्याही आपल्याला मिळतील. शिक्षणासाठी भरपूर पैसे लागतात, जो तो त्याच्या कुवतीप्रमाणे आपल्या नौकरीचे स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतो. परंतु आरक्षणामुळे आपल्याला लोकांना नोकऱ्या भेटत नाही.
मी तुमच्या लेकरांसाठी भांडायला आलो आहे. तुम्ही तुमच्या लेकरासाठी उभे राहा, ही शेवटची लढाई आहे. आणि ती मी तुमच्या जीवावर लढतोय, अशी भावनिक साद जरांगे पाटील यांनी उपस्थितांना घातली. तुम्हाला मला साथ द्यावी लागणार आहे. मी कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असा विश्वासही त्यांनी समाज बांधवांना दिला. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला होता. परंतु काही लोकांनी तो पुढे ढकलला. तरी मराठा समाज आता थांबणार नाही.
या आंदोलनामध्ये प्रत्येकाचे हाल झाले. 350 हून अधिक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. आंदोलकांवर विविध प्रकारचे विनाकारण गुन्हे दाखल केले गेले. आरक्षण आपल्याला मिळणार आहे, त्यात आता फक्त सगेसोयरेची अंमलबजावणी करायची बाकी आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून पंधरा दिवसात हरकती मागवल्या, त्याला एक महिना झाला. त्या पंधरा दिवसात राज्य सरकारने एक डाव टाकून समाजाला दहा टक्के आरक्षण दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या आरक्षणामुळे मराठा समाज (Maratha Reservation) खूश नाही. दहा टक्के आरक्षणाची आमची मागणी नव्हती. स्वार्थासाठी मी आंदोलन केले नाही. पूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अधिवेशनात जाहीर सांगितले मराठा मागास आहे. जी जात मागास आहे, तिला ओबीसीत टाकावे लागते. ओबीसी सोडून मराठ्यांना वेगळे आरक्षण का दिले ? असा सावलही जरांगे यांनी यावेळी केला. हे आरक्षण टिकले नाही तर सरकारने सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. कुणबी- मराठा एकच असल्याचा पुनरुच्चारही जरांगे पाटील यांनी केला.
(Edited By : Sachin Waghmare)