
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ताप व व्हायरलचा त्रास आहे.
त्यांना संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.
त्यांच्या प्रकृतीबाबत समर्थक व जनतेत चिंता व्यक्त केली जात आहे.
Maratha Reservation News : नारायण गडावरील दसरा मेळावा अवघ्या 24 तासांवर आलेला असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. तापाने फणफणलेले अंग आणि शरीरात असलेल्या कणकणीमुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नारायण गडावरील दसरा मेळाव्याला आपण कुठल्याही परिस्थितीत जाणारच परंपरा खंडित होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
सततचा प्रवास आणि उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांची प्रकृती ढासळलेली आहे. औषधोपचार, सलाईन घेऊन ते राज्यभराचा दौरा करतात. मराठा आरक्षणासाठी गेल्या दीड दोन वर्षांपासून सुरू असलेला लढा नुकताच यशस्वी ठरला. महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत जीआर काढला. यामुळे मराठा समाजाचा विजय होऊन हैदराबाद गॅझेट मधील नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नारायण गडावर होणारा दसरा मेळावा विशेष ठरत आहे. मराठवाड्यात (Marathwada) अतिवृष्टी, महापुराने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यालाही धीर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मध्यंतरीच्या काळात पाहणी दौरे केले. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कालच रुग्णालयातून त्यांची सुट्टी झाली होती.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सोलापूर आणि मोहोळ भागाचा दौरा करून पूरग्रस्त नागरिकांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातही त्यांनी आपत्तीग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. याशिवाय नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी आणि त्याचा आढावाही जरांगे पाटील यांनी घेतला होता.
मात्र काल रात्री पुन्हा त्यांना प्रचंड ताप आणि अंग दुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर तातडीने त्यांना रात्री उशिरा पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत, त्यांची प्रकृती बिघडली आहे. व्हायरलमुळे अशक्तपणा आला असून त्यांना अशा परिस्थितीत दौरा करता येणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. परंतु नारायण गडावरील दसरा मेळावा ठरल्याप्रमाणे होणार आणि आपण तिथे जाणारच, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
नारायण गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा कदापी खंडित होऊ देणार नाही, असे सांगत जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याला जाण्याची तयारीही सुरू केली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशावेळी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी नारायण गडाच्या दसरा मेळाव्या दरम्यान डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती आहे.
प्र.१: मनोज जरांगे पाटील यांना कोणता त्रास झाला आहे?
उ: त्यांना ताप व व्हायरल इन्फेक्शनचा त्रास झाला आहे.
प्र.२: त्यांना कुठे दाखल करण्यात आले आहे?
उ: संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
प्र.३: त्यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती कशी आहे?
उ: उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.
प्र.४: मनोज जरांगे पाटील कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत?
उ: ते मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते आहेत.
प्र.५: त्यांच्या प्रकृतीमुळे आंदोलनावर काही परिणाम होणार का?
उ: हो, त्यांच्या प्रकृती बिघडल्याने आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.