Maratha Reservation News : मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली डेडलाईन शनिवारी संपली. आजची रात्र सरकारकडे आहे, मराठा आरक्षण जाहीर करा, नाहीतर पुन्हा उपोषण, मुंबईतही धडकणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरात सरकारला दिला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मराठवाड्यात काढलेल्या शांतता रॅलीचा समारोप आज संभाजीनगर मध्ये झाला.
यावेळी केलेल्या भाषणात मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange ) यांनी शेवटचा डाव मला टाकू द्या, असे आवाहन मराठा समाजाला केले. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अजूनही शहाणे व्हा, मराठ्यांचा रोष ओढवून घेऊ नका, असा शब्दात सावध केले. मी कुठलाही निर्णय घाईने घेत नाही, थांबून विचारपूर्वक निर्णय घेत असतो. मी सर्व दिमागाने खेळत असतो, प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नाही. बुद्धीचाही वापर करायचा असतो.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शिंदे, अजितदादा आणि महाजन यांनाही डावात हरवले, ही सोपी गोष्ट नाही. भुजबळ आता काहीही बडबडताय, प्रत्येक वेळी सरकार फसले, त्यांनी आपल्याला फसवण्याचे काम केले. त्यांना मी जे वाटलो होतो, तसा मी नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मला वेळ देत जा, एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही. समाज फसला तर मी स्वतला आयुष्यभर माफ करणार नाही. मला तुमच्या जीवावर काहीच कमवायचं नाही. मला तुमची पोरं मोठी झालेली पाहायची आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.
मला वेडा म्हणणाऱ्यांना मी समाजाला आरक्षण मिळवून दाखवलच ना असे म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांवरही निशाणा साधला. भुजबळ पायावर चालत असतील पण मी डोक्यावर चालतो. माझ्यामुळे तुला औषध सुरु झाली. उपस्थीत गर्दीचा उल्लेख करत फडणवीस साहेब, शिंदे साहेब आरक्षण द्या, ही गर्दी फक्त संभाजीनगराची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल, अशा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
सरकारला आता एकच संधी आहे, आरक्षण द्या नाहीतर 20 तारखेला महाराष्ट्रात 288 उभे करायचे का पाडायचे? याची तारीखच जाहीर करतो, असा दम जरांगे पाटील यांनी सरकारला भरला. मुंबईला कधी, कुठे यायचे आणि उमेदवार उभे करायचे की पाडायचे याच्या दोन तारखा बैठक घेऊन ठरवू. एकदा बैठकीत ठरलं तर त्यात पुन्हा बदल केला जाणार नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.