Dharashiv District News : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील विनोद ऊर्फ बंडू त्र्यंबक गायकवाड (वय ४०) यांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.१७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यांच्याजवळ मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत मिळालेली माहिती अशी सरमकुंडी येथील ४० वर्षीय विनोद ऊर्फ बंडू त्र्यंबक गायकवाड हे मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाल्यापासून या लढ्यात सक्रिय सहभागी होते. विविध ठिकाणी चर्चा करत असताना कायम ते मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडत असत. मात्र अद्यापर्यंतही आरक्षण मिळालेले नसल्याने ते व्यथित होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ''माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणून मी आता आंदोलन करून कंटाळलो आहे. त्यामुळे मी मरुन जात आहे. त्यामुळे मी फाशी घेतली,'' असे लिहिले आहे.
विनोद गायकवाड यांना गुरुवारी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास नागरिकांनी गावात पाहिले होते. मात्र, यानंतर ते कोणासही दिसले नव्हते. शिवाय रात्रभर ते घरी न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली गेली. अखेर सरमकुंडी-तांदूळवाडी रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतात सर्व्हे नबंर ७३ मधील आंब्याच्या झाडाला पांढऱ्या उपरण्याच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी व पाच वर्षांची एक मुलगी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक एस. डी. दसुरकर यांनी घटनास्थळी सहकाऱ्यासह दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृहदेह वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आणि शवविच्छेदनानतंर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दोन दिवसांपूर्वीच बुधवारी शहरात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली. या सभेला विनोद गायकवाड उपस्थित होते. सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी आपल्याला आरक्षण मिळणारच असल्याचे सांगितले अन् आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये, असे आवाहन केले होते.
मात्र, सभेच्या दुसऱ्याच दिवशी तालुक्यात आरक्षणासाठी आत्महत्येची घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून, आरक्षणासाठी शासन आणखी किती बळी घेणार? अशी चर्चा ग्रामीण रुग्णालय परिसरात व शहरातील नागरिकांमध्ये ऐकावयास मिळत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.