

मराठवाड्यातील कोट्यवधी रुपयांच्या 30-30 घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
न्यायालयाने तपास यंत्रणेच्या सादरीकरणानंतर आरोपीच्या ताब्यातील पुरावे आणि निधी चाचणीसाठी महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
या निर्णयामुळे घोटाळ्याशी संबंधित इतर आरोपींवरही कारवाईची शक्यता वाढली आहे.
Scam News : मराठवाड्यासह महाराष्ट्रात गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला आरोपी अशोक दिपचंद चव्हाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोरवाडे यांनी नामंजूर केला. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला दुसरा आरोपी सुदाम मानसिंग चव्हाण याने सादर केलेला नियमीत जामीन अर्जही फेटाळण्यात आला.
प्रमोद पंडीत जाधव (वय 40, रा. बंजारा कॉलनी, खोकडपूरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार, फिर्यादीचे मामेसासरे राजेंद्र उर्फ पंकज जाधव याने सचिन उर्फ संतोष राठोड याच्याशी फिर्यादीची ओळख करुन दिली. व राठोड चालवित असलेल्या 30-30 योजनेबाबत माहिती देत गुंतवलेल्या रक्कमेवर महिन्याला 15 टक्के पर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवले. आमिषाला बळी पडून फिर्यादीने सुमारे 50 लाख तर त्यांचा चुलत भाऊ राजेंद्र सुंदरलाल जाधव यांना 1 कोटी 45 लाख रुपये गुंतवले होते.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात आतापर्यंत 62 साक्षीदारांची 18 कोटी 96 लाख 44 हजार 900 रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी आरोपी अशोक चव्हाण याने अटकपूर्व जामीनीसाठी अर्ज केला होता. तर अटक व सध्या न्यायालयीन कोठडीतील आरोपी सुदाम चव्हाण याने नियमीत जामीनीसाठी अर्ज सादर केला होता.
दोन्ही अर्जांच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी युक्तीवाद केला. आरोपी सुदाम चव्हाण याने दोन जणांची 47 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचे तर पसार आरोपी अशोक चव्हाण याने सहा जणांना तब्बल 2 कोटी 85 हजारांना गंडा घातल्याचे न्यायालयाच्या निदेर्शनास आणून देत आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली होती.
काय आहे घोटाळा?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन आणि शेंद्रा परिसरात 2015 मध्ये डीएमआयसी सारखा प्रकल्प आला. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना 23 लाख रुपये एकरने मोबदला मिळाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी रातोरात कोट्यावधीश झाले. दरम्यान, याच काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या संतोष राठोडने दामदुप्पट करून देणारी योजना आणली. यासाठी त्याने सुरवातीला बिडकीन परिसरातील आपल्या नातेवाईकांना जाळ्यात ओढलं.
माझ्याकडे पैसे गुंतवणूक केल्यास महिन्याला 7 टक्के परतावा देणार असल्याचे सांगत त्याने सुरवातीला लाखो रुपये जमा केले. विशेष म्हणजे त्याने परतावा देखील दिला. पाहता पाहता गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. पुढे त्याने शक्कल लढवली आणि नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्या सहकाऱ्यांना त्यांचं कमिशन देणं सुरू केलं. महागड्या गाड्या, सूटबुटातील तरुण, अंगावर सोनं असणारी त्याची टोळी गावागावात फिरू लागली. या टोळीतील प्रत्येकाच्या गाडीचं तीस-तीस असं व्हीआयपी नंबर परिसरात चर्चेचा विषय बनू लागला. गुंतवणूकदारांना ही टोळी घरी जाऊन थेट पोत्यातून पैसे काढत परतावा देत होती.
पाहता पाहता शेकडो शेतकऱ्यांनी आपला मोबदला या योजनेत गुंतवला. काहींनी जमिनी विकून तर काहींनी घर विकून या योजनेत पैसे घातले. पुढे पोलीस, सरकारी अधिकारी, शिक्षक, हॉटेल चालक यांनी देखील या योजनेत पैसे गुंतवायला सुरुवात केली. एवढेच काय एका आमदाराचे देखील या योजनेत पैसे गुंतवल्याचे बोलले गेले. या योजनेच्या नावाखाली तब्बल 500 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल केली होती.
1. 30-30 घोटाळा म्हणजे काय?
हा मराठवाड्यातील कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार असून, शेतकरी, शिक्षक, डाॅक्टरांसह सर्वसामान्यांना जादा परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
2. न्यायालयाने काय निर्णय दिला?
खंडपीठाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून तपासासाठी आरोपीची आवश्यकता असल्याचं सांगितलं.
3. हा घोटाळा कुठे घडला होता?
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
4. आरोपीविरुद्ध कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल आहे?
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत फसवणूक व आर्थिक अपहाराचे कलम लागू करण्यात आले आहेत.
5. पुढील सुनावणी कधी होणार आहे?
तपास यंत्रणेला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, पुढील सुनावणी काही दिवसांत अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.