Satish Chavan: महायुतीत अब्दुल सत्तारांचा उघड विरोध, पण मित्रपक्षांनी सोबत राहून सतीश चव्हाणांचा केला गेम!

Marathwada Graduate Constituency Result: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण आणि प्रतापसिंह पाटील यांच्यातील लढतीनंतर महायुतीतील मतभेद चर्चेत आले. अब्दुल सत्तार यांनी पाटील यांना पाठिंबा दिला, तर मित्रपक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले.
Satish Chavan
Satish ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महायुतीने सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. याचे पडसाद मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये उमटले. माजी आमदार संजय केनेकर, माजी शिक्षणाधिकारी राहिलेले आणि पदवीधरच्या उमेदवारीसाठीच भाजपामध्ये दाखल झालेले एम.के. देशमुख, सतीश चव्हाण यांच्याविरुद्ध आक्रमक पावित्रा घेणारे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचा विरोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आल्यानंतर गळून पडला होता. मात्र आजच्या निकालावरुन महायुतीच्या मतभेदाची चर्चा पुन्ही रंगली आहे.

शिवसेनेने सतीश चव्हाण यांना पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती. अमरावती, पुण्यामध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादीच्या बंडखोरांना बळ दिल्याचा राग यातून व्यक्त करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये आमचा पाठिंबा सतीश चव्हाण यांना नसेल असे जाहीर केले होते.

पण ४८ तासातच शिवसेनेचे हे अवसानही गळून पडले आणि सतीश चव्हाण यांची गळाभेट घेत संजय शिरसाट यांनी आम्ही त्यांचे तनमनधनाने काम करणार, असे जाहीर केले. या सगळ्या नाट्यमय घडामोडीत शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मात्र उघडपणे महायुतीच्या विरोधात भूमिका घेत महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली.

मतदारसंघातील आपल्या संपर्क कार्यालयातच प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी पदवीधरांचा मेळावा घेतला. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या आदेशानूसारच आपण काम करत असल्याचे सांगत आम्ही वारंवार भूमिका बदलू शकत नाही, आता प्रतापसिंह पाटील यांचेच काम करणार असे ठणकावून सांगीतले. विशेष म्हणजे ते आपल्या शब्दावर ठाम राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांच्या या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजीही व्यक्त केली. पण त्याचा परिणाम सत्तार यांच्यावर झाला नाही.

Satish Chavan
Praful Patel: विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर प्रफुल पटेलांचा संताप; पक्ष नेतृत्वालाच दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला

सत्तार डोळ्यावर, बाकीचे नामानिराळे

अब्दुल सत्तार यांनी उघडपणे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतली. ते डोळ्यावर आले, पण वरिष्ठांच्या दबावामुळे आपण सतीश चव्हाण यांचे काम मनापासून करतो आहोत, असा आव आणणारे मराठवाड्यातील भाजपा आणि शिवसेनेचे त्या त्या जिल्ह्यातील नेते मात्र नामानिराळे राहिले. महायुतीच्या मित्रपक्षांनी सतीश चव्हाण यांचा केसाने गळा कापला, असा आरोप आता होऊ लागला आहे. युतीने आपली पूर्ण ताकद सतीश चव्हाण यांच्या पाठीशी लावली असती तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे चित्र वेगळे दिसले असते हे समोर आलेल्या महायुती व महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

तीन टर्म आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांना २००८ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसने मराठवाडा पदवीधरमधून उमेदवारी दिली. तेव्हा ते दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निवडून आले होते. साडेतीन हजार मतांच्या फरकाने त्यांनी पहिला विजय नोंदवला होता. तर २०१४ मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीची ६८ हजार ७६५ तर २०२६ सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८ मते मिळाली आहेत. भाजपाच्या विरोधात लढलेल्या सतीश चव्हाण यांनी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी, महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोनवेळा पहिल्या पसंतीत तर एकदा दुसऱ्या पसंतीवर विजय मिळवला होता.

Satish Chavan
Marathwada Election Results: सतीश चव्हाणांची चौथ्या टर्मची आमदारकी हिरावली, पराभूत उमेदवाराने सांगितला प्रतापसिंहांच्या विजयामागचा 'चाणक्य' कोण..?

महायुतीतील मतविभाजनाची चर्चा

या निवडणुकीत महायुती असताना भाजपा आणि शिवसेनेने सतीश चव्हाण यांचा गेम केल्याचे बोलले जात आहे. युतीतील या दोन्ही पक्षांची मते सतीश चव्हाण यांना मिळालीच नाही हे त्यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट होत आहे.उलट या दोन्ही पक्षांची महाविकास आघाडीच्या डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना छुपी मदत झाल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे प्रताप पाटील यांनीही आपण सगळ्याच पक्षाचे आवडचे उमेदवार होतो, मला सगळ्यांची मदत झाली आहे. विजयी झाल्यानंतर सगळ्यांचे आभार मानायला जाणार असल्याचे सांगत या आरोपांवर शिक्कामोर्तबच केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com