औरंगाबाद : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यसाठी आम्ही कटीबद्ध असून विविध विकास कामांसाठी शासन भरीव निधी उपलब्ध करुन देत आहे. तसेच या सर्व कामांचा यापुढे मंत्रालय स्तरावरुन नियमित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.
मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी विविध विकास कामांच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केल्या. (Marathwada) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त् मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यानात आज ध्वजारोहण करण्यात आले. (Aurangabad) या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षासही आज सुरूवात झाली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
कुसुमाग्रजांच्या कवितेतील "एकच तारा सोर आणिक पायतळी अंगार" ही ओळ उद्घृत करुन मुख्यमंत्री म्हणाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अशा ध्येयधुंद भावनांनी हैद्राबाद मुक्ती लढ्यासाठी जीवाची बाजी लावुन तुरुंगवास भोगला, हौतात्म्यही पत्करले. अशा सर्व ज्ञात- अज्ञात स्वातंत्र्य सेनानी आणि वीरांगणांना आदरांजली अर्पण करतो. मराठवाडा मुक्तिसंग्राम हे आपल्या इतिहासातील देदीप्यमान पर्व होते. आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे काळाची गरज आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांचा मिळून हैद्राबाद मुक्तिसंग्राम कार्यक्रम असणार आहे. हैद्राबाद संस्थानवर निजाम मीर उस्मान अली यांचे राज्य होते. त्यांच्या राजवटीतून मुक्त होवून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदु, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते. या लढयातील सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोल करणे शक्य नाही असेही शिंदे म्हणाले.
यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. यात प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातील श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदीर, वेरुळ परिसराचा विकास, औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वे मार्गासाठी भूसंदपादन, क्रीडा विद्यापीठाची स्थापना, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, शहराच्या जून्या पाणी पुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन, समृध्दी महामार्गाने शिर्डी येथे जाण्यासाठी १७ कि.मी. पोच मार्गाची दर्जोन्नती. विश्वास नगर, लेबर कॉलनी येथे जिल्हाधिकारी कार्यालय संकूल व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम.
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे नूतनीकरण. मराठवाडा वाटर ग्रीड मध्ये नांदूर मधमेश्वर प्रकल्पातील ४ धरणांचा समावेश करून बंद पाईपलाईनव्दारे पाणी उपलब्ध करणार. मध्य गोदावरी उपखो-यात ४४ प्रकल्पांना शासन मान्यता, शनिदेव उच्च पातळी बंधा-याच्या कामास मान्यता.
जायकवाडी धरणाच्या कालव्याची व वितरीकांची दुरुस्ती, म्हैसमाळ येथे तारांगण बांधकाम व अनुषंगीक कामे, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविणे. म्हैसमाळ येथील गिरीजामाता मंदीर भाविक व पर्यटकांसाठी भौतिक सुविधा, वेरुळ येथे अभ्यागत केंद्रामधील बाह्य वळण रस्त्याचे बांधकाम व सुशोभिकरण सुलिभंजन येथील दत्त धाम ते परियोका तालाब पर्यटन सुविधा आदींचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.